
Epstein Files Donald Trump : अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या एपस्टीन फाईल्सने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या फाईल्समध्ये अमेरिकेतील अब्जाधीश बिल गेट्स, संशोधक स्टिफन हॉकिंग, सुप्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सन अशा दिग्गजांचे फोटो समोर आले आहेत. सोबतच अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही काही फोटो या फाईल्समध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाच आता न्याय विभागाने एपस्टीन फाईल्समधील आणखी काही फोटो, व्हिडीओ रिलीज केले आहेत. या नव्या फोटोंच्या मदतीने आता डोनाल्ड ट्रम्प णि जेफ्री एपस्टीन यांच्यात घनिष्ट संबंध होते, असा दावा केला जात आहे. ट्रम्प यांनी एपस्टीन याच्यासोबत त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये अनेकवेळा प्रवास केलेला आहे. एका प्रवासादरम्यान ट्रम्प यांच्यासोबत 20 वर्षीय तरुणी होती, असेही सांगितले जात आहे. आता या नव्या दाव्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून ट्रम्प यांची अडचण आणखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्समधील आणखी काही फोटो आणि व्हिडीओ तसेच कागदपत्रे रिलीज केले आहेत. या नव्या कागदपत्रांत डोनाल्ड ट्रम्प यांचा अनेकदा उल्लेख केलेला आहे. एपस्टीन फाईल्समधील नव्या कागदपत्रांत डोनाल्ड ट्रम्प आणि लैंगिक गुन्ह्यातील दोषी जेफ्री एपस्टीन या दोघांनी 1990 च्या दशकात अनेकदा एकत्र येत प्रायव्हेट जेटमधून प्रवास केलेला आहे. एका प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत 20 वर्षांची युती होती, असेही सांगण्यात आले आहे.
सोबतच ट्रम्प यांच्यासोबत 20 वर्षीय तरुणी असल्याची नोंद असली तरी त्या तरुणीचे शोषण झालेले आहे, हे यातून सिद्ध होत नाही. तसेच एपस्टीन फाईल्समध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव असले म्हणजे ती संबंधित व्यक्ती दोष्टी आहे किंवा तिने एखादा गुन्हा केला आहे, हे सिद्ध होत नाही, असेही एपस्टीन फाईल्समध्ये सांगण्यात आलेले आहे.
एपस्टीन फाईल्समधील एक मेल आता समोर आला आहे. हा मेल न्यूयॉर्कमधील दक्षिणी जिल्ह्याच्या वरिष्ठ वकिलांनी 7 जानेवारी 2020 रोजी लिहिलेला आहे. या मेलचा विषय हा एपस्टीन फ्लाईट रेकॉर्ड असा आहे. याच मेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीन यांनी एकत्र किती वेळा प्रवास केला याचा लेखाजोखा देण्यात आलेला आहे.
मेलमध्ये उल्लेख केल्यानुसार 1993 ते 1996 अशा तीन वर्षांत एपस्टीन याच्या प्रायव्हेट जेटमध्ये ट्रम्प यांनी कमीत कमी आठ वेळा प्रवास केला. यापैकी चार वेळा एपस्टीन याची साथीदार गिस्लेन मॅक्सवेल ही उपस्थित होती. एपस्टीन याने केलेल्या लैंगिक शोषणात मॅक्सवेल ही सहभागी असल्याचे मानले जाते. तिला या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षादेखील मिळालेली आहे. एका उड्डाणांदरम्यान ट्रम्प यांच्यासोबत 20 वर्षीय तरुणी होती, असाही उल्लेख या मेलमध्ये आहे.
दरम्यान, आता एपस्टीन फाईल्समधील या नव्या माहितीने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ट्रम्प यावर नेमकं काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.