
पाकिस्तानची अजून पोल-खोल करण्यासाठी भारताने आपली अनेक शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली आहेत. विविध पक्षांचे खासदार या डेलिगेशनमध्ये आहेत. जगातील 33 देशांमध्ये ही शिष्टमंडळं पाठवण्यात आली आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारताची पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका कायम आहे. कुवैतला गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळात AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी आहेत. त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी पीएम शहबाज शरीफ यांना एक फोटो गिफ्ट केला. त्याचा सुद्धा उल्लेख ओवैसी यांनी केला. कुवैत येथे भारतीय प्रवाशांशी चर्चा करताना AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणाची निंदा केली. पाकिस्तानी सैन्य स्वत:ची भारतासोबत तुलना करण्याचा प्रयत्न करतं, त्यावरही त्यांनी टीका केली. पाकिस्तानने केलेल्या दाव्यांवर प्रश्न निर्माण केले. पाकिस्तान जे बोलतो, त्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “पाकिस्तान धर्माचा मुद्दा उचलून ते मुस्लिम आहेत, हे बोलू शकत नाही. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. आम्ही भारतीय मुस्लिम पाकिस्तानपेक्षा जास्त प्रामाणिक आहोत” पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी त्यांचे पीएम शहबाज शरीफ यांना एक फोटो भेट म्हणून दिला. त्यावरुन ओवैसींनी पाकिस्तानची खिल्ली उडवली. म्हणाले, “या मूर्ख जोकर्सना भारताशी सामना करायचा आहे. 2019 सालच्या चिनी सैन्यासोबतच्या ड्रीलचा एक फोटो त्यांनी शहबाज शरीफ यांना भारतावर विजय म्हणून गिफ्ट केला” “पाकिस्तान हेच करतो. नक्कल करण्यासाठी अक्कल पाहिजे. पाकिस्तानकडे अक्कल नाही” अशा शब्दात ओवैसींनी पाकिस्तानचा समाचार घेतला.
FATF च्या ग्रे लिस्टच महत्त्व काय?
पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये पुन्हा टाकलं पाहिजे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. “FATF च्या ग्रे लिस्टच महत्त्व हे आहे की, जेव्हा तुम्ही पैशाचा व्यवहार करणार, तेव्हा त्या देशाच्या प्रत्येक व्यवहारावर बारीक लक्ष असतं. पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी हवाला किंवा मनी लॉन्ड्रिंगचा मार्ग अवलंबतो. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा FATF मध्ये टाकलं पाहिजे. कारण IMF कडून दिलं जाणारं 2 अब्ज डॉलर्सच कर्ज पाकिस्तानी सैन्य वापरणार” असं ओवैसी म्हणाले.