
अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. अशातच आता अमेरिकेने पश्चिम आफ्रिकेतील देश नायजेरियाला गंभीर इशारा दिला आहे. यापुढे ख्रिश्चन लोकांची हत्या केल्यास अमेरिकन सैन्य हल्ला करेल असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला जलद लष्करी कारवाईसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून नायजेरियाला होणारी सर्व प्रकारची मदत तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारला इशारा देताना म्हटले की, ‘जर तुम्ही ख्रिश्चनांना वाचवू शकला नाहीत तर अमेरिकेच्या तोफा आणि सैन्य तयार आहे. इस्लामिक दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अमेरिका सक्षम आहे. आम्ही हल्ला केला तर तो जलद, भयानक आणि निर्णायक असेल. ज्या प्रमाणे दहशतवादी ख्रिश्चनांवर हल्ला करत आहेत तसाच हा हल्ला असेल, त्यामुळे नायजेरिया सरकारने त्वरित कारवाई करावी.’
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी याबाबत म्हटले की, ‘आम्ही कारवाईसाठी तयारी करत आहेत. जर नायजेरिया सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरले तर आमचे सैन्या इस्लामिक दहशतवाद पसरवणाऱ्या संघटनांचा खात्मा करेल.’ दरम्यान, अमेरिकन सरकारने धार्मिक छळ मोठ्या प्रमाणात होतो अशा देशांच्या यादीत नायजेरियाचा समावेश केला आहे. या यादीत पाकिस्तान, रशिया, चीन, म्यानमार आणि उत्तर कोरिया या देशांचाही समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले होते की, नायजेरियात हजारो ख्रिश्चन लोकांची हत्या झाली आहे. इस्लामिक अतिरेकी ख्रिश्चनांना टार्गेट करत आहेत, मात्र नायजेरीयाचे अध्यक्ष बोला अहमद टिनुबू हे आम्ही धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षक आहेत असा दावा करत आहे. अलिकडेच नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते. यात मंत्रालयाने म्हटले होते की, आम्ही दहशतवादाविरुद्ध युद्ध लढत आहोत आणि अमेरिकेसोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध असतील अशी आशा आहे. दरम्यान, बोको हराम दहशतवादी संघटनेने नायजेरियामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरवला आहे.