बुलेटप्रूफ जॅकेट असूनही पाकिस्तानचं सैन्य पळालं; आणखी एक शहर पाकच्या हातातून निसटलं, जगभरात बेइज्जती

पाकिस्तानच्या एका शहरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, हल्ला झाल्यानंतर तेथील सैनिकांनी प्रतिकार न करताच घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना समोर आली आहे.

बुलेटप्रूफ जॅकेट असूनही पाकिस्तानचं सैन्य पळालं; आणखी एक शहर पाकच्या हातातून निसटलं, जगभरात बेइज्जती
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 26, 2025 | 4:31 PM

21 जून 2025 रोजी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे पाकिस्तानी जवानांच्या हिंमतीची चांगलीच पोलखोल झाली आहे. बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातल्या कर्देगाप येथील तहसील कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयावर दहशतवाद्यांनी ताबा मिळवला, यावेळी दहशतवाद्यांनी या सरकारी कार्यालयावर जोरदार गोळीबार केला, बॉम्ब हल्ला देखील झाला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू होता. जेव्हा दहशतवाद्यांनी कर्देगाप येथील सरकारी कार्यालय आपल्या ताब्यात घेतले तेव्हा तिथे पाकिस्तानच्या अर्ध सैनिक दलाचे 18 जवान तैनात होते, मात्र त्यांनी कुठलाही प्रतिकार न करता आपली शस्त्र खाली ठेवली आणि घटनास्थळावरून पळून गेले.

समोर आलेल्या माहितीनुसार कर्देगापवर झालेला हल्ला, तसेच या जवानांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले शस्त्र यांचे फोटो दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दहशतवाद्यांकडून जवानांकडे असलेल्या बुलेटप्रूफ जाकॅटचे देखील फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत. दहशतवाद्यांनी टाकलेल्या या फोटोंमुळे जगभरात पाकिस्तानी सैन्यदल विनोदाचा विषय बनला आहे. पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानी सैनिकांनी कशाप्रकारे आत्मसमर्पण केलं याचे फोटो देखील सोशल मीडियावर टाकले आहेत. मात्र हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच आता पाकिस्तानकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे.

या घटनेनंतर आता पाकिस्तानच्या सरकारने या जवानांविरोधात कडक कारवाई केली आहे. ज्या जवानांनी दहशतवादी हल्ला होताच आपली शस्त्रं खाली ठेवून घटनास्थळावरून पलायन केलं होतं, अशा 18 सैनिकांविरोधात बडतर्फीचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने या प्रकरणात काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की, या जवानांमुळे केवळ सरकारच्या संपत्तीचंच नुकसान झालेलं नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला देखील धक्का लागला आहे. हल्ला झाल्यानंतर हे जवान जर पळून गेले नसते तर शस्त्र दहशतवाद्यांच्या हाती लागले नसते.  दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा बलुचिस्तानमध्ये असे हल्ले झाले आहेत, बलूच आर्मीकडून वेगळ्या बलुचिस्तानची मागणी होत आहे.