2019 मध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी मेजर ठार
2019 मध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर मोईझ अब्बास शाह नावाचा अधिकारी ठार मारला गेल्याची माहिती समोर येत आहे. सरगोधा इथं टीटीपीच्या हल्ल्यात तो मारला गेला.

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा इथं टीटीपीच्या (तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान) हल्ल्यात मेजर मोईझ अब्बास शाह नावाचा अधिकारी मारला गेला आहे. मेजर मोईझ अब्बास शाह हा तोच अधिकारी आहे, ज्याने 2019 मध्ये बालाकोट स्ट्राइकदरम्यान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडकर अभिनंदन वर्धमान यांना पकडलं होतं. टीटीपीच्या हल्ल्यात मेजर मोईझ अब्बास शाह आणि लान्स नाईक जिब्रान मारले गेले आहेत. तर चकमकीत टीटीपीचे 11 जण मारले गेल्याचं पाकिस्तानी लष्कराने म्हटलंय.
‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने मंगळवारी सांगितलं की खैबर पख्तूनख्वाच्या दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यात झालेल्या गुप्त कारवाईत दोन सैनिक मारले गेले. तर इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या निवेदनानुसार, 24 जून 2025 रोजी सुरक्षा दलांनी दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यातील सरगोधा भागात एक कारवाई केली. या कारवाईत मेजर मोईझ अब्बास शाह आणि लान्स नाईक जिब्रान ठार झाले. मेजर मोईझ हे पाकिस्तानी दहशतवादाविरुद्धच्या अनेक अभियानांमधील धाडसी कारवायांसाठी ओळखले जायचे, असं पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग ISPR ने म्हटलंय.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट इथल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला होता. यालाच बालाकोट एअर स्ट्राइक म्हटलं गेलं होतं. या हल्ल्यात जैशचे अनेक मोठे दहशतवादी मारले गेले होते. दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान हवाई दलाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदर श्रीनगरच्या 51 स्क्वॉड्रनमध्ये तैनात होते आणि मिग-21 बायसन उडवत होते. त्यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-16 लढाऊ विमानाला लक्ष्य केलं होतं. अभिनंदन यांनी पाकिस्तानी एफ-16 ला आव्हान दिलं आणि आकाशात त्याचा पाठलाग सुरू केला. दीर्घ लढाईनंतर त्यांनी एफ-16 पाडलं होतं. पण यादरम्यान, अभिनंदन यांचं मिग-21 विमान पाकिस्तानी क्षेपणास्त्राने धडकलं. अखेर त्यांना विमानातून बाहेर पडावं लागलं होतं. पण तोपर्यंत ते नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) गेले होते.
जेव्हा अभिनंदन पॅराशूटने पीओकेमध्ये उतरले, तेव्हा स्थानिक पाकिस्तानी लोकांनी त्यांना भारतीय पायलट समजून त्यांच्यावर हल्ला केला. अभिनंदन त्यांनी स्वत:च्या रक्षणेसाठी हवेत गोळ्या झाडल्या आणि नंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांचं उल्लंघन करून पाकिस्तानी लष्करी अधिकारी मोईझ अब्बास शाह यांनी अभिनंदन यांना पकडलं होतं, असा दावा करण्यात आला होता.
