इस्त्रायल-इराण युद्धामुळे पाकिस्तानसमोर संकट, बलुचिस्तानमध्ये संघर्ष वाढणार, ट्रम्पसमोर मुनीर यांची भीती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर यांची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानने इराण सीमा आणि फुटरवादी गट याबाबत चिंता व्यक्त केली.

इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे पाकिस्तान घाबरला आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा पराभव झाला तर त्याचे परिणाम पाकिस्तानात होतील. इराणच्या पराभवानंतर पाकिस्तान आणि इराणच्या सीमेवर असलेले फुटीरवादी सक्रीय होतील, अशी भीती लष्कर प्रमुख सैयद आसीम मुनीर यांना आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर त्यांनी ही भीती व्यक्त केली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत खुलासा केला आहे. बलुचिस्तानमधील फुटीरतावादी सशस्त्र गटांनी त्यांचे हल्ले तीव्र केले आहेत, त्यावेळी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी ही भीती व्यक्त केली आहे.
ट्रम्प मुनीर यांच्यात दोन तास चर्चा
बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची चर्चा झाली. लष्करी बंड झाले नसताना राजकीय पदावर नसलेल्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ होती. या भेटीनंतर ट्रम्प म्हणाले, मुनीर यांना भेटल्यानंतर अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन तास चाललेल्या बैठकीत व्यापार, आर्थिक विकास आणि क्रिप्टोकरन्सी तसेच दहशतवादावर चर्चा झाली.
फुटीरवादी संघटना फायदा घेणार
ट्रम्प आणि मुनीर यांच्या बैठकीत पाकिस्तानने इराण सीमा आणि फुटरवादी गट याबाबत चिंता व्यक्त केली. हे गट इस्त्रायलसोबत सुरु असलेल्या संघर्षाचा फायदा उचलू शकतात. पाकिस्तान आणि इराण दरम्यान 900 किमीची सीमा रेषा आहे. त्या ठिकाणी तेहरान आणि इस्लामाबाद विरोधातील संघटना सक्रीय आहे. या संघटनांनी इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर फायदा घेण्याची रणनीती तयार केली आहे. इराणमधील फुटीरवादी संघटना जैश-अल-अदलने म्हटले आहे की, इराण आणि इस्त्रायल संघर्ष ही एक चांगली संधी आहे. ही संघटना पाकिस्तानमधून बलुचिस्तानमधून सक्रीय आहे. बलुचिस्तानमधील विद्रोही गटसुद्धा त्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, 13 जून रोजी जैश अल-अदलने बलुचिस्तानच्या लोकांसाठी पाकिस्तानी सशस्त्रदलाच्या विरोधात संघर्षात सहभागी होण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर बलुचिस्तान आर्मीकडून पाकिस्तानमध्ये हल्ले तीव्र झाले आहेत. त्यामुळेच मुनीर यांनी भीती व्यक्त केली.