
इस्लामाबाद | 30 डिसेंबर 2023 : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. इम्रान खान हे तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी मियांवाली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. इम्रान खान यांनी ज्या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तिथे ते नोंदणीकृत मतदार नाहीत, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. इम्रान खानच्या टीमने आयोगाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने फक्त मियांवालीच नाही तर लाहौर मतदारसंघामधील देखील त्यांचा उमेदवारीचा अर्ज फेटाळला आहे.
इम्रान खान गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर काही महत्त्वाचे कागदपत्रे लीक केल्याचा आरोप आहे. पण त्यांना निवडणूक लढवण्याबाबतची मान्यता पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिली होती. देशाची संवेदनशील कागदपत्रे लीक करण्याबाबतची कोणतीही सामग्री किंवा पुरावे इम्रान खान यांच्याकडे मिळालेले नाहीत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने इम्रान खान निवडणूक लढवण्यास अपात्र असल्याच्या याचिकेला फेटाळलं होतं. त्यानंतर इम्रान खान निवडणूक लढवतील, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार त्यांनी निवडणुकीसाठी दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्जही केला. पण आता निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दोन्ही मतदारसंघांतून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
इम्रान खान यांना एप्रिल 2022 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर ते राजकीय आणि कायदेशीर लढाईचा समाना करत आहेत. मधल्या काळात एका आंदोलनादरम्यान त्यांच्यावर गोळीबाराचादेखील प्रयत्न झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर संवेदनशील कागदपत्रे लीक केल्याचा आरोप केल्याप्रकरणी जेलमध्ये जावं लागलं. त्यानंतर येत्या राष्ट्रीय निवडणुकीत त्यांचा विजय होऊन ते पुन्हा सत्तेत येतील का? याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. इम्रान खान स्वत: पुन्हा पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत होते. पण त्यांच्या या स्वप्नाचा चुराळा झालाय. कारण निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्जच फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होण्याच्या ऐवजी उलट वाढल्याच आहेत.
पाकिस्तानात 8 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 28 हजार 626 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला किती यश मिळतं? याकडे संपूर्ण पाकिस्तानासह जगाचं लक्ष लागलं आहे. पीटीआय पक्षाला निवडणुकीत यश मिळालं तर पुढचा काळ इम्रान खान यांच्यासाठी दिलासादायक ठरु शकतो. अन्यथा इम्रान खान यांच्यासाठी आगामी काळ कठीण ठरण्याची चिन्हं आहेत.