
गरीबी आणि दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. पाकिस्तानला आपले एक विमानतळ विकावे लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान बऱ्याच काळापासून राजधानी इस्लामाबाद विमानतळ दुसऱ्या देशाला चालवण्यासाठी देण्याच्या विचारात होता. यासाठी ब्रिटिश-तुर्की कन्सोर्टियमनेही एक ऑफर दिली होती, मात्र पाकिस्तानने ती नाकारली होती, आता पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीशी करार केला आहे. त्यामुळे आता इस्लामाबाद विमानतळाचे व्यवस्थापन यूएईकडे देण्यात आले आहे. आता विमानतळातून मिळणारी रक्कम ही दोन भागात विभागला जाईल. काही पैसे पाकिस्तानला मिळतील आणि उर्वरित रक्कम ही यूएईला मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पाकिस्तान सरकार गेल्या काही काळापासून इस्लामाबाद विमानतळ दुसऱ्या देशाकडे चालवायला देण्याच्या प्रयत्नात होते. पाकिस्तानचे विमान वाहतूक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव वसीम तारिक यांनी याबाबत सांगितले की, युएईने पाकिस्तानला एकूण महसुलाच्या 60 टक्के रक्कम देण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता करार अंतिम करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी, ईआरजी यूके आणि तुर्कीच्या टर्मिनल यापीने यांनी पाकिस्तानला 40 % रक्कम देण्याची ऑफर दिली होती, मात्र पाकिस्तान सरकारने ती नाकारली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान एकूण 3 विमानतळांचे व्यवस्थापन दुसऱ्या देशाकडे सोपवण्याच्या प्रयत्नात आहे. यातील इस्लामाबाद विमातळाबाबत करार अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर आता लाहोर आणि कराची ही दोन विमानतळेही दुसऱ्या देशांकडे सोपवली जाणार आहेत. यासाठी आर्थिक सल्लागारांची नियुक्ती केली जात आहे. या विमानतळांमधूनही पाकिस्तानला चांगला आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आहे, तरीही आयएमएफ डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला $1.2 अब्ज कर्ज देण्याची शक्य़ता आहे. काही दिवसांपूर्वी आयएमएफने पाकिस्तानला पैशांचा अपव्यय थांबवण्याचा आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता खाजगीकरण आयोगाचे सचिव उस्मान बाजवा यांनी म्हटले की, डिसेंबरपर्यंत पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची विक्री करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे पाकिस्तानला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.