पाकिस्तानात मोठं काही घडणार? पंतप्रधानांच्या खूर्चीला धोका? हजारो लोक रस्त्यावर, संसद…
पाकिस्तानात राजकीय अस्थिरता वाढली आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआय समर्थकांनी इस्लामाबादकडे लाँग मार्च काढला आहे. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले असून, हिंसक धुमश्चक्री व धरपकड सुरू आहे. शरीफ सरकारवर दबाव वाढला असून, त्यांची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानमध्ये मोठं काही घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. इमरान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (PTI) च्या समर्थकांनी रविवारी खैबर पख्तूनख्वाच्या लक्की मारवतपासून लाँग मार्च काढला. या लाँग मार्चमध्ये हजारो लोक सामील झाले होते. इस्लामाबादेच्या दिशने या मोर्चेकऱ्यांनी कूच केली होती. यातील 2 हजार आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. मोर्चेकरी संसदेच्या दिशेने येऊ नये म्हणून संसदेकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहता पाकिस्तानात केव्हाही काहीही घडू शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे.
लक्की मारवत पासून 3 किलोमीटर पुढे फ्रंटियर फोर्स आणि इमरान खान समर्थकांमध्ये काल धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर प्रचंड लाठीमार केला. तब्बल तासभर ही धुमश्चक्री उडाली होती. मोर्चेकरीही आक्रमक झाले होते. तासाभरानंतर हा मार्च पुन्हा सुरू झाला. आंदोलकांचं आक्रमक रुप पाहून सरकारने आधीच संसद आणि हायवेचे मार्ग कंटेनर लावून बंद केले होते.
आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने पीटीआयचे खासदार शहजाद शहबाज आणि आर्मी चीफ आसिम मुनीर यांच्यात संध्यकाळी उशिरा बैठक झाली. पण त्यात कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं जातं. या आधी शनिवारी रात्री पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पीटीआयच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली. सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा पीटीआयने केला आहे.
मेलो तरी हटणार नाही…
लक्की मारवत येथे आलेल्या मार्चमध्ये वसीम नावाचा 22 वर्षाचा तरुणही सहभागी झाला होता. मेलो तरी हरकत नाही. शहबाज आणि मुनीर यांनी कितीही अत्याचार करावेत, आम्ही मागे हटणार नाही. लाँग मार्च इस्लामाबादला गेल्याशिवाय राहणार नाही, असं वसीम म्हणाला. तर सिंधमधून आलेल्या जाकीरने, शहबाज शरीफ यांचं सरकार रोजगार, महागाई आणि कायदा सुव्यवस्था आदी मुद्द्यावर फेल असल्याचं सांगत हे सरकार उखडून टाकण्याची वेळ आल्याचं म्हटलं. इमरान खान यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. आता लोक शांत बसणार नाहीत, असा इशारा पंजाबमधून आलेल्या मोहसीनने दिला.
चार दिवस धोक्याचे?
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांनी रविवारी रात्री मोठी घोषणा केली. मोर्चा सुरूच राहील. कुणी मागे हटायचे नाही, असं अफरीदी यांनी जाहीर केलं. टँक, डेरा इस्माइल खान, दक्षिण वजीरिस्तान, उत्तर वजीरिस्तान, बन्नू आणि लक्की मारवतचे समर्थक गांधी चौकातून मार्चमध्ये सामील झाले. हा मार्च करक, कोहाट आणि पेशावरवरून पुढे जाईल. उद्या 6 ऑक्टोबर रोजी कोहाट, हंगू, कुर्रम आणि ओरकजईतील लोकही मोर्चात सामील होणार आहेत. तर 7 ऑक्टोबर रोजी पेशावर आणि 8 ऑक्टोबर रोजी चरसद्दा आणि मोहम्मंद येथील समर्थक मोर्चात सामिल होणार आहेत. म्हणजेच पुढचे आजपासून चार दिवस शरीफ सरकारसाठी धोक्याचे असल्याचं मानले जात आहेत.
पंतप्रधान शरीफ यांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी आंदोलकांना इस्लामाबादेत प्रवेश दिला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने राजधानीच्या सर्व प्रवेश मार्गांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केल्याची माहितीही त्यांनी दिली.
तर खुर्ची धोक्यात…
इमरान खान यांच्या समर्थकांचा लाँग मार्च खैबरमधून पंजाबमध्ये येताच शहबाज शरीफ सरकारवर दबाव वाढेल. मोर्चाला व्यापक समर्थन मिळालं तर आर्मी चीफ मुनीर यांच्याही अडचणी वाढतील. त्यामुळेच हा मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. इमरान यांची लोकप्रियता अजून कायम आहे. मोर्चा जर इस्लामाबादेत आला तर शहबाज यांची खुर्चीही धोक्यात येऊ शकते, असं पाकिस्तानमधील भारतीय उच्चायोगात नियुक्त असणाऱ्या अविनाश मोहनानी यांनी सांगितलं.
सरकारशी दोनदा चर्चा, पण…
सरकार आणि पीटीआयच्या दरम्यान, शुक्रवार आणि शनिवारी दोन बैठका झाल्या. पण कोणत्याच मुद्द्यावर सहमती झाली नाही. इमरान खान यांची तात्काळ सुटका करावी आणि त्यांना रुग्णालयात शिफ्ट करण्यात यावं, अशी पीटीआयची प्रमुख मागणी आहे. मात्र, सरकारकडून आधी आंदोलन रद्द करण्याची अट ठेवण्यात आली होती. पण जोपर्यंत इमरान यांची सुटका होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं पीटीआयने सरकारला सुनावलं. त्यामुळे बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही.
पत्नी आणि बायकोही तुरुंगात
दरम्यान 73 वर्षीय इमरान खान 2023 पासून रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंद आहेत. त्यांच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तीन प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल कादिर ट्रस्टे केसमध्ये त्यांना 14 वर्षाची, दस्ताऐवज लीक प्रकरणात 10 वर्षाची आणि तोशाखाना प्रकरणात 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणात इमरान यांची पत्नी बुशरा या सुद्धा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर, सप्टेंबरमध्ये इमरान यांची बहीण अलीमा, उजमा आणि नूरीन यांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतलं आहे.