सापांना पोसणं भोवलं… पाकिस्तानात दहशतवाद्यांचा थेट शाळेच्या बसवर हल्ला, विद्यार्थी दगावले; पाक पुन्हा हादरलं
Pakistan: पाकिस्तानमध्ये एक आत्मघातकी हल्ला झाला असून यावेळी एका शाळेच्या बसला लक्ष्य करण्यात आले आहे, ज्यामध्ये चार मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं आहे.

Pakistan School Bus Terror Attack : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मात्र यावेळी दहशतवाद्यांनी थेट स्कूल बसला टार्गेट करत चिमुकल्या, निष्पाप मुलांना लक्ष्य केलं आहे. बलुचिस्तानमधील खुजदार येथे झालेल्या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाला आहे तर 38 जण जखमी झाले आहेत. अधिकृत माहितीनुसार, एका आत्मघातकी कार बॉम्बरने शाळेच्या बसला लक्ष्य केलं आणि क्षणात ती उद्ध्वस्त झाली.
पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने खुजदारचे उपायुक्त यासिर इक्बाल दश्ती यांच्या हवाल्याने सांगितले की, हा स्फोट खुजदार जिल्ह्यात झाला. झिरो पॉइंटजवळ असताना बसला लक्ष्य करण्यात आले. या स्फोटात चार मुले ठार झाली आणि जखमींचे मृतदेह जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असे दश्ती म्हणाले.
या घटनेनंतर गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला. “निष्पाप मुलांना लक्ष्य करणारे प्राणी कोणत्याही दयेस पात्र नाहीत” अशा शब्दांत त्यांनी या हल्ल्यानंतर निंदा केली. शत्रूने निष्पाप मुलांना लक्ष्य करून अतिशय क्रूर कृत्य केल्याचंही नक्वी पुढे म्हणाले.
असा झाला हल्ला
नैऋत्य पाकिस्तानमध्ये सकाळी एका आत्मघातकी बॉम्बर कारने शाळेच्या बसला धडक दिली. त्यानंतर बसमध्ये स्फोट झाला आणि निष्पाप मुले या घृणास्पद कृत्याचे बळी ठरली आणि 4 मुलांचा जागीच मृत्यू झाला, असे असोसिएटेड प्रेसने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले. मात्र या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही, पण बलुच फुटीरतावाद्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. तेअनेकदा या प्रदेशातील सुरक्षा दलांना आणि नागरिकांना लक्ष्य करतात.
हल्ल्याची चौकशी सुरू
बस स्फोटानंतर, पोलिस, फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) आणि कायदा संस्थांचे कर्मचारी तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी, प्राथमिक तपासात हा हल्ला आत्मघातकी स्फोट असल्याचे दिसून येत असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.
BLA वर शंकेची सुई
बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून बंडखोरीचा सुरू असून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) सह अनेक फुटीरतावादी गट हल्ले करत आहेत. अमेरिकेने 2019साली बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.
यापूर्वी 6 मे रोजी, पाकिस्तानी लष्कराने सांगितले होते की बलुचिस्तानमध्ये त्यांच्या वाहनाला एका तत्कालिक स्फोटकाने धडक दिल्याने त्यांचे सात सैनिक ठार झाले होते.