
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशिया यांच्यात अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. व्यापार, इंधन, अणुउर्जा तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात भारत-रशियात द्विपक्षीय करार झाले आहेत. पुतिन यांच्या भारत भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानचीही पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे बरिक लक्ष होते. असे असतानाच आता नेहमीच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानने भारतासोबत आणखी एक भांडण काढले आहे. पाकिस्तानने चीनला पाठिंबा देत थेट भारताविरोधात भूमिका घेतली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना खतपाणी घातलं जातं. जगभरातील बड्या देशांनीही हे याआधी मान्य केलेलं आहे. पाकिस्तान भारताला नेहमीच डिवचत आला आहे. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून तर पाकिस्तान-भारतात अनेकदा युद्ध झाले आहे. असे असतानाच आता पाकिस्तानने चीनच्या अरुणाचल प्रदेशबाबतच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. चीनला पाठिंबा देऊन पाकिस्तानने एका प्रकारे पुन्हा भारताला डिवचले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात वाद वाढतो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
चीन या देशाची नेहमीच विस्तारवादी भूमिका राहिलेली आहे. भारताचा अरुणाचलप्रदेश हा भाग आमचाच आहे, असा दावा चीनकडून केला जातो. या मुद्द्यावरून भारत-चीन यांच्याच वेळोवेळी वादही झालेला आहे. तैवान हा आमचाच प्रदेश आहे, असा चीनचा दावा असतो. त्यानंतर आता अरुणाचलप्रदेशविषयीदेखील चीन मोठे दावे करतो आहे. एखादा प्रदेश शक्तीच्या जोरावर बळकावता न आल्यास चीन संबंधित प्रदेश आमचाच आहे, असे सांगत फिरतो. चीनच्या याच विस्तारवादी भूमिकेचे पाकिस्तानने समर्थन केले आहे.
अरुणाचल प्रदेशमधून चीनमध्ये गेलेल्या एका महिलेला चीनमध्ये अवैध पद्धतीने ताब्यात घेण्यात आले होते. त्या महिलेकडे असलेला भारताचा पासपोर्ट अवैध आहे, असा दावा चीनने केला होता. या दाव्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली होती. हा वाद पेटल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी जांगनान (अरुणाचल प्रदेश) हा चीनचाच भाग आहे, असे विधान केले आहे. भारताने अवैध पद्धतीने अरुणाचल प्रदेशची स्थापना केलेली आहे. या भागाला चीन मान्यता देत नाही, असे माओ म्हणाले होते. भारताने चीनच्या या भूमिकेनंतर थेट प्रत्युत्तर दिले. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेकडे वैध पासपोर्ट आहे. ती शांघाई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून जपानला जात होती, असे भारताने सांगितले आहे.
दरम्यान, पाकिस्तानने चीनच्या अरुणाचल प्रदेशच्या दाव्याचे समर्थन केले आहे. चीनने अरुणाचल प्रदेशावर केलेल्या विधानाचा अभ्यास केला आहे. पाकिस्तान चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित बाबींमध्ये चीनला पाठिंबा देत आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे आता भारत नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.