
Asim Munir : पाकिस्तान हा भारताविरोधात नेहमीच काहीतरी कुरापती करत असतो. युद्धात अनेकवेळा माती खाल्लेली असली तरीही हा देश भारताला डिवचत असतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन संदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला पाणी पाजलं. या युद्धानंतर पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. तरीदेखील या देशाच्या कुरापती संपता संपत नाहीयेत. पाकिस्तानच्या संरक्षण प्रमुखपदी (सीडीएफ) विराजमान झाल्यानंतर फील्ड मार्शल असीफ मुनीर याने जे विधान केले आहे, यातून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुनीरने भारताला थेट धमकी दिली आहे. याआधीही मुनीर याने भारताला थेट धमकी दिलेली आहे. भारताने मात्र त्याच्या धमक्यांना भीक घातलेली नाही. आता मात्र सीडीएफपदाची जबाबदारी आल्यानंतर मुनीर याने पुन्हा एकदा भारताला धमकावलं आहे.
असीम मुनीर याची पाकिस्तानी सरकारने लष्कराच्या सर्वोच्च अशा सीडीएफ या पदावर बसवले आहे. सीडीएफ पदाची जबाबदारी आल्यानंतर मुनीरचे अभिनंदन करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात मुनीर बोलत होता. यावेळी बोलताना मुनीर याने भारताला थेट धमकी दिली. “भारताने भ्रमात राहू नये. यावेळी पाकिस्तान आणखी तीव्र आणि जलद असेल,” असे मुनीर याने म्हटले आहे.
या कार्यक्रमात बोलताना मुनीर याने पाकिस्तानी लष्कराची प्रशंसा केली. तसेच पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान चांगली कामगिरी केली, असे म्हणत लष्कराचा गौरव केला. भारताच्या ऑपरेशन सिंदूदरम्यान पाकिस्तानी लष्कराची कामगिरी ही भविष्यात केस स्टडी ठरणार आहे. युद्ध आता सायबरस्पेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, अंतराळ, एआय, क्वान्टम कॉम्युपटिंगपर्यंत विस्तारले आहे. त्यामुळे आता सैन्याने आधुनिक युद्धसज्ज राहायला हवे, असेही मत मुनीर याने व्यक्त केले.
दरम्यान, मुनीर सीडीएफ पदावर विराजमान झाला आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी तो या पदावर असेल. तसेच असीम मुनीर याची फील्ड मार्शल म्हणूनही पदोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुनीर पाकिस्तानी लष्करात काय बदल करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.