Donald Trump : ट्रम्प यांचा चमत्कार! थांबवली 37 वर्षांची लढाई, नोबेल शांतता पुरस्काराची कोण घाई
Armenia and Azerbaijan peace deal : टॅरिफ लादूनही भारत काही युद्ध थांबवण्याचे क्रेडिट देत नाही म्हटल्यावर मग आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसरीकडे मोर्चा वळवला. त्यांनी दोन देशात सुरु असलेली 37 वर्षांची कटुता संपवली. आता त्यांना नोबेल शांतता पुरस्कार पक्का मानण्यात येतो.

तर अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चमत्कार घडवला. भारताने युद्ध थांबवण्याचे शल्य तेवढे ट्रम्प यांच्या मनात आहेच म्हणा. पण गेल्या 37 वर्षांपासून सुरु असलेली दोन देशातील कटुता त्यांनी संपवली. आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशात 37 वर्षांपासून विस्तव जात नव्हता. पण व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी चमत्कार घडवला. दोन्ही देशांच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या साक्षीने कटुतेला तिलांजली दिली. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान आणि अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव हे दोन्ही नेते व्हाईट हाऊसमध्ये एकत्र आले. त्यांनी शांतता करारावर हस्ताक्षर केले. त्यानंतर लागलीच ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचे क्रेडीट लाटलेच. जगातील 6 युद्ध थांबवल्याचा दावा त्यांनी केला. अर्थात त्यात भारत-पाकिस्तान या संघर्षाचा समावेश होताच.
आता 7 वे युद्ध थांबवणार
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचा धडाका लावला आहे. भूतो न भविष्यती अशी त्यांनी मुसंडी मारली. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले प्रदीर्घ युद्धही लवकरच थांबवण्यात येईल असा दावा त्यांनी केला. जवळपास चार दशकांपासून आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात संघर्ष सुरू होता. त्यावर यशस्वी तोडगा ट्रम्प यांनी काढला. व्हाईट हाऊसमध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांनी हातात हात घेतला आणि त्यावर अर्थातच ट्रम्प यांनी हात ठेवत दोघांचे मनोमिलन झाल्याचे संकेत दिले. दोन्ही देशात नागोर्नो-काराबाख या प्रांतावरून वाद सुरू होता.
ट्रम्प यांचा नोबेल शांतता पुरस्कार पक्का
तर पाकिस्तान, इस्त्रायलच नाही तर इतर जागतिक नेत्यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची वकिली केलीच आहे. त्यात अजून मोदी सरकार सहभागी झालेले नाही, हीच ती काय खंत आहे. त्यातच आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये 37 वर्षांनी वैर संपुष्टात येऊन ते मित्र झाले आहेत. जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नाही तर, मग कोणाला शांतता पुरस्कार मिळेल? असा सवाल अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांनी केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांचा नोबेल शांतता पुरस्कार पक्का मानण्यात येत आहे.
6 युद्ध थांबवल्याचा तो दावा
तर ट्रम्प यांनी यावेळी आपण सहा देशांतील तणाव निवाळल्याचा, त्यांच्यातील युद्ध थांबवल्याचा आरोप केला आहे. त्यात भारत-पाकिस्तान, इस्त्रायल-इराण, थायलंड-कंबोडिया, रवांडा-कांगो, सर्बिया-कोसावो आणि इजिप्त-इथियोपिया यांच्यातील युद्धाचा समावेश आहे.
