रशिया हाच भारताचा सर्वात भारी मित्र, अमेरिकेला चेकमेट करणारे आकडे; तुम्हीही व्हाल चकित!

Russia India Friendship : इंधन संकटाच्या काळात रशिया पुन्हा एकदा भारताचा सर्वात चांगला मित्र असल्याचे समोर आले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे.

रशिया हाच भारताचा सर्वात भारी मित्र, अमेरिकेला चेकमेट करणारे आकडे; तुम्हीही व्हाल चकित!
India russia Relation
Image Credit source: Google
| Updated on: Apr 14, 2026 | 3:00 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे भारताच्या तेल आणि नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अशातच आता या इंधन संकटाच्या काळात रशिया पुन्हा एकदा भारताचा सर्वात चांगला मित्र असल्याचे समोर आले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. यामुळे रशियाकडून तेल आयात करण्याच्या बाबतीत तीन वर्षांचा विक्रमही मोडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डेटा एजन्सी केपलरने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात भारताने रशियाकडून दररोज सरासरी 19.8 लाख बॅरल तेल आयात केले, हा जून 2023 नंतरचा सर्वाधिक आकडा आहे. नायरा एनर्जीची 4 लाख बॅरल प्रतिदिन क्षमतेची रिफायनरी बंद असल्यामुळे एप्रिलमध्ये हा आकडा घटून 15.7 लाख बॅरल प्रतिदिन झाला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पुढील महिन्यापासून आयात पुन्हा वाढेल. याचाच अर्थ भारताला गरज असताना रशिया पुन्हा एकदा आपल्या मदतीला धावला आहे.

तेल खरेदी सुरूच राहणार

युद्ध सुरू झाल्यानंतर मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंधांमध्ये सवलत दिली होती. यानंतर भारताने मार्चमध्ये सुमारे 6 कोटी बॅरल तेल खरेदी केले असून, पुढेही ही खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे. रिफायनरी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सध्या ही खरेदी संपूर्ण वर्षभर सुरू राहू शकते. अमेरिकेकडून दिली गेलेली ही सवलत लवकरच वाढवली जाऊ शकते. मात्र, सवलत नसतानाही खरेदीत फारशी घट होण्याची शक्यता नाही, असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

भारताची भूमिका स्पष्ट

भारताने तेल खरेदीबाबत अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, देश आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी म्हटले की, भारताची प्राथमिकता देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळवणे ही आहे. कच्च्या तेलाची खरेदी तांत्रिक आणि व्यावसायिक निकषांवर आधारित असते, म्हणजे जे तेल रिफायनरीसाठी योग्य आणि स्वस्त असेल, तेच खरेदी केले जाईल.

Follow Us