
भारतासह अनेक देशांवर अमेरिकेचा रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला जात आहे. हेच नाही तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत आणि रशियातील चांगले संबंध आजपासूनचे नाही तर अनेक वर्षांचे आहेत. भारताचे बऱ्यापैकी अर्थिक गणित रशियाच्या तेलावर अवलंबून आहे. दुसरीकडे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, यादरम्यान रशियाने अमेरिकेचा मोठा गेम केला आहे. भारतात रशियाचे तेल पोहोचत आहे. मात्र, याची दुरपर्यंत साधी कल्पनाही अमेरिकेला नाहीये. युरोपियन थिंक टँक सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालात असे दिसून आले आहे की, रशियाने भारताला कच्चे तेल पुरवण्यासाठी खोटे झेंडे लावणाऱ्या जहाजांचा वापर केला.
अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2025 दरम्यान, 30 जहाजांनी 2.1 अब्ज युरो म्हणजेच तब्बल 22 हजार कोटी किंमतीचे 5.4 दशलक्ष टन रशियन तेल भारतात आले. मात्र, या रशियन तेल कंपन्यांच्या जहाजावर रशियाचा झेंडा नव्हता. खोटे झेंडे लावून रशियन तेल असलेली जहाजे भारतात दाखल झाली. जहाजांवरील खोटे झेंडे म्हणजे जहाजावर त्याच्या मूळ झेंडाऐवजी परदेशाचा झेंडा फडकतो, जेणेकरून त्याची ओळख आणि मालक दोन्ही सापडणार नाही.
अहवालानुसार, रशियाचा सतत वाढणारा डमी फ्लीट आता त्याच्या तेल निर्यातीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. हे हल्ले थांबवण्यासाठी रशियाच्या ऊर्जेवर निर्बंध लादण्याचे काम सुरू आहे. या निर्बंधांना टाळण्यासाठी मॉस्कोवर खोटे झेंडे लावणाऱ्या शॅडो फ्लीट किंवा टँकर जहाजांचा वापर केल्याचा आरोप आहे. मात्र, यावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
कारण रशियातून एखादे जहाज तेल घेऊन निघाले, त्यावेळी त्याच्यावर कोणत्या देशाचा झेंडा लावला, यामध्ये भारताची कोणत्याही प्रकारची भूमिका येत नाही. मात्र, मिळालेल्या अहवालानंतर मोठी खळबळ उडाल्याचे सध्या बघायला मिळत आहे. आता यावर अमेरिका नेमकी काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरेल.