
नवी दिल्लीपासून युक्रेनचे अंतर जवळपास 5000 किलोमीटर इतके आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सोमवारी त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. दोन्ही देशातील युद्धावर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. पण ही चर्चा निष्फळ ठरली. दोन्ही देशांना शांतता हवी आहे. त्यासाठी दोन्ही देश भारताशी चर्चा करत आहेत. भारताने रशियाकडून कच्चे इंधन खरेदीचा निर्णय घेतल्याने भारताचे महत्त्व वाढले आहे. भारताने शांततेसाठी रशियाचे मन वळवावे अशी मागणी युरोपियन संघाने केली आहे.
युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न कोणी नाकारू शकत नाही. जगातील काही युद्ध थांबवण्यात त्यांनी नक्कीच प्रयत्न केले आहेत. अलास्का येथे त्यांनी पुतिन यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला तर व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि युरोपियन नेत्यांना शांततेसाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निदान युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू झाली. ट्रम्प यांनी याविषयीची कोंडी फोडली.
पुतिन-झेलेन्स्की यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन
अलास्का येथून परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉल केला. त्यांनी ट्रम्प यांच्याशी शांतता चर्चेची माहिती दिली. मोदींनी युक्रेन संघर्ष हा शांततेने सोडवावा याासाठी भारत वचनबद्ध असल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा झाली.
त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. रशियाकडून वारंवार होत असलेल्या बॉम्ब हल्ल्यावर, विशेषतः झापोरिजियावर झालेल्या हल्ल्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी रशियाच्या इंधन निर्यातीवर प्रतिबंध लावण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे रशियाची आर्थिक बाजू कमकुवत होईल असे ते म्हणाले. भारत दोन्ही देशात शांततेसाठी जो प्रयत्न करत आहे, त्याचे त्यांनी कौतुक केले. तर सप्टेंबरमध्ये UNGA मध्ये भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. आता हे दोन्ही देश अमेरिकाच नाही तर भारताला पण शांतता करारासाठी प्रभावी मानत असल्याचे दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.