India-Pakistan War Situation : जे रशिया, व्लादिमीर पुतिन यांना जमत नाहीय, ते पाकिस्तान करणार, इतकी हिम्मत?

India-Pakistan War Situation : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव टीपेला पोहोचला आहे. सीमेवर युद्धासारखी स्थिती आहे. त्यात पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे नेते सतत पोकळ धमक्या देत आहेत. आजवर जे रशिया, व्लादिमीर पुतिन यांना जमलेलं नाहीय, ते आम्ही करणार असं पाकिस्तान म्हणतो, इतकी हिम्मत आहे का त्यांच्यात?

India-Pakistan War Situation : जे रशिया, व्लादिमीर पुतिन यांना जमत नाहीय, ते पाकिस्तान करणार, इतकी हिम्मत?
shehbaz sharif-vladimir putin
| Updated on: May 02, 2025 | 2:07 PM

रशिया आज महासत्ता नसला, तरी जगातील एक शक्तीशाली देश आहे. अमेरिकेला थेट टक्कर देण्याची धमक जगाच्या पाठिवर कोणाकडे असेल, तर ती रशियामध्ये आहे. रशियाने अनेकदा हे दाखवून सुद्धा दिलय. आजही जगाची दोन गटात विभागणी होते, ते अमेरिका आणि रशियाच्या बाजूने असलेले देश कुठले? दुसरं महायुद्ध संपल्यापासूनच अमेरिका आणि रशियामध्ये स्पर्धा वाढत गेली. शीत युद्धाच्या काळात तर हा संघर्ष इरेला पेटला होता. आजही रशिया आणि अमेरिकेमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. हे दोन्ही देश आजवर अनेक युद्ध लढले आहेत. अमेरिकेने अनेक वर्ष अफगाणिस्तानात युद्ध लढलं. आता रशिया युक्रेन विरोधात युद्ध लढत आहे. रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्ष होत आली, तरी अजून हे युद्ध संपलेलं नाही.

या युद्धात चेहरा युक्रेनचा असला, तरी खरं युद्ध अमेरिका-रशिया असंच आहे. रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांकडे गनी मशीनपासून फायटर जेट्सपर्यंत तोडीस तोड अत्याधुनिक शस्त्र आहेत. आज जगात याच दोन देशांकडे सर्वाधिक अणूबॉम्ब आहेत. आज युक्रेन विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात रणनितीक दृष्टया रशिया सरस आहे. खरंतर आजच्या घडीला जगातील अनेक देशांना अंगावर घेण्याची ताकद असलेला रशिया एक मोठी अण्विकशक्ती आहे. युक्रेनवर लवकरात लवकर संपूर्ण विजय मिळवण्यासाठी अणवस्त्रांचा वापर करण्याचा पर्याय व्लादिमीर पुतिन यांच्याकडे आहे.

अणूबॉम्ब वापरणं इतकं सोपं आहे का?

पण युद्धाला तीन वर्ष झाल्यानंतरही त्यांनी या विषयाला कधी हात घातलेला नाही. एवढ्या मोठ्या युद्धानंतर रशियामध्ये सुद्धा अजून अणूबॉम्बच अस्त्र वापरण्याची हिम्मत नाहीय, आणि हा पाकिस्तान आणि त्यांचे नेते सारखे अणूबॉम्बची धमकी देत असतात. अणूबॉम्ब वापरणं इतकं सोपं आहे का? हिरोशिमा आणि नागासकीच्या रुपाने जगाने अणू युद्धाचे भयानक परिणाम पाहिले आहेत. त्यामुळे कुठल्याही देशासाठी अणवस्त्र हल्ला करणं इतकं सोपं नाही.

हाच संदेश पाकिस्तानला द्यायची गरज

कुठलाही देश अणूबॉम्ब का बनवतो? तर शत्रूला रोखण्यासाठी. पाकिस्तानने सुद्धा अणूबॉम्ब याचसाठी बनवलाय. पण एकाबाजूला दहशतवादी हल्ले करायचे आणि दुसऱ्याबाजूला भारताला अणूबॉम्बची धमकी द्यायची, हे कितीकाळ कोण सहन करेल. भले तुमच्याकडे अणूबॉम्ब असेल पण तुम्हाला जशास तसं उत्तर मिळणार. भारताने 2016 आणि 2019 मध्ये दाखवून दिलय. त्यावेळी सुद्धा पाकिस्तानकडे अणूबॉम्ब होता. या अणूबॉम्ब धमकीला आम्ही बधणार नाही, हाच संदेश पाकिस्तानला द्यायची गरज आहे.