Russian Oil Purchase : भारत अजूनही.. तेल खरेदीच्या मुद्यावरुन रशियाने अमेरिकेच्या जखमेवर चोळलं मीठ

Russian Oil Purchase : भारताची रशियन तेल खरेदी अमेरिकेच्या डोळ्यांना खुपत होती. म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. काही दिवसांपूर्वी ट्रेड डील झाली. त्यावेळी टॅरिफ 50 वरुन 18 टक्के केला. आता रशियाने भारताच्या तेल खरेदीच्या मुद्यावरुन अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

Russian Oil Purchase : भारत अजूनही.. तेल खरेदीच्या मुद्यावरुन रशियाने अमेरिकेच्या जखमेवर चोळलं मीठ
Donald Trump-PM Modi
| Updated on: Feb 19, 2026 | 9:38 AM

ट्रेड डील झाल्यापासून भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे दावे अमेरिकेकडून सातत्याने केले जात आहेत. आता यावर रशियन परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. भारत आमच्याकडून तेल खरेदी कमी करणार हा अमेरिकेचा दावा रशियाने फेटाळून लावला आहे. भारताच्या भूमिकेत बदल झाल्याचे कोणतेही संकेत आम्हाला मिळालेले नाहीत, असं बुधवारी रशियन परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. भारत-रशिया तेल व्यापार जागतिक ऊर्जा बाजारपेठेसाठी फायद्याचा असून त्यामुळे स्थिरता राहते असं रशियाचं म्हणणं आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहे, या अमेरिकेच्या दाव्यानंतर रशियन परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे. “भारताने रशियन हायड्रोकार्बन खरेदीच्या आपल्या भूमिकेत बदल केलाय असं मानायला काही कारणं नाही. भारत रशियाकडून हायड्रोकार्बन खरेदी करतो. त्यामध्ये दोन्ही देशांचा फायदा होतो. आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात किंमतीमध्ये स्थिरता ठेवण्यास मदत होते” असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

त्यानंतर रशियाकडून अशी प्रतिक्रिया आली

“अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या वक्तव्यांमध्ये काही नवीन नाहीय. त्यांनी स्वतंत्र देशांकडून आपल्या हिशोबाने काम करण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे” असं मारिया ज़खारोवा म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काही दिवसांपूर्वी फोनवरुन चर्चा झाली. त्यानंतर रशियाकडून अशी प्रतिक्रिया आली आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेनंतर अमेरिकेने भारतावरील 50 टक्के टॅरिफ हटवून 18 टक्के केला. यात भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता.

भारताची भूमिका काय?

भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा शब्द दिला आहे असं मार्को रुबियो मागच्या आठवड्यात म्हणाले. ऊर्जा खरेदीच्या विषयात राष्ट्रीय हिताला प्राधान्य असेल असं भारताने म्हटलं. त्यानंतर अमेरिकेकडून हे स्टेटमेंट देण्यात आलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुद्धा असाच दावा केलाय की, ‘भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार’ आता मारिया ज़खारोवा यांचं स्टेटमेंट बिलकुल या उलट आहे. ट्रम्प यांच्या दाव्यावर अजूनपर्यंत भारताने कुठलंही जाहीर भाष्य केलेलं नाही तसच रशियन तेल खरेदी कधी बंद करणार या बद्दलही काही म्हटलेलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us