
गेल्या काही काळापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांमुळे जगाची झोप उडवलेली आहे. अशातच आता ट्रम्प यांनी मध्य पूर्वेबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी ट्रुथ या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, ‘विशेष काहीतरी घडणार आहे. मध्य पूर्वेकडत महानता प्राप्त करण्याची संधी आहे.’ ट्रम्प यांच्या या पोस्टमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता मध्य पूर्वेत नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफचा निर्णय घेत संपूर्ण जगाची झोप उडवली होती. त्यानंतर आता त्यांनी मध्य पूर्वेत काहीतरी घडण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मध्यपूर्वेत महानतेची संधी आपल्याकडे आहे. सर्वजण पहिल्यांदाच काहीतरी खास करण्यासाठी सज्ज आहेत. आम्ही ते पूर्ण करू.’ डोनाल्ड ट्रम्प हे नेमकं कशाबाबत बोलत आहेत याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र त्यांच्या या इशाऱ्यामुळे जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्ये पूर्वेत सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धात गाझा पट्टीत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आगामी काळात ट्रम्प इस्रायल-हमास युद्धाबाबत महत्त्वाची घोषणा करु शकतात. याआधी ट्रम्प यांनी गाझामधील युद्ध संपवण्यासाठी करार होणार असल्याचे विधान केले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट घेणार आहेत. या भेटीत युद्ध संपण्याबाबतच्या कराराबाबत चर्चा होण्याची आणि अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असल्याचती चर्चा रंगली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा मुद्द्यावर एक करार करण्याबाबत भाष्य केले होते. तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईनबद्दल चिंता व्यक्त करत आणि हमासविरुद्धचे युद्ध थांबवण्याची भाषा केली होती. ब्रिटन, फ्रान्स आणि इतर अनेक देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिल्यानंतर नेतन्याहू यांनी हे विधान केले होते. त्यानंतर आता नेतन्याहू सोमवारी ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यानंतर युद्ध थांबण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.