रात्री 9 वाजता एचआरचा फोन, 2 मिनिटात नोकरी गेली, इंजीनिअर क्षणात रस्त्यावर
एका भारतीय इंजिनिअरला अमेरिकन कंपनीतून अचानक कामावरून काढण्यात आले, कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण न देता. रात्री ९ वाजताच्या HR कॉलमध्ये त्याला नोकरी गेल्याचे कळलं. हा अनुभव त्याने Reddit वर शेअर केला, जिथे इतरांनीही असेच धक्कादायक प्रसंग सांगितले.

दिवसभराचं काम संपलं, तो झोपायला जायच्या तयारीत होता. तेवढ्यातच फोन खणखणला, पाहिलं तर HRचा कॉल होता. अवघं दोन मिनिटं बोलणं झालं. ना काही चूक सांगितली, कोणतीही नोटीसही दिली नाही. रात्री 9 वाजता झालेल्या या कॉलमध्ये अवघ्या काही मिनिटांत त्याला कंपनीतील नोकरी संपल्याचे सांगण्यात आलं. विशेष म्हणजे, त्याला कोणतीही चूक दाखवण्यात आली नाही किंवा कामगिरीबाबत तक्रारही करण्यात आली नाही. कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीसही न देता कंपनीने त्याचं काम संपवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन कंपनीसाठी भारतातून वर्क फ्रॉम होम करणारा हा इंजिनिअर आपल्या टीममधील एकमेव भारतीय कर्मचारी होता. मात्र अचानक काढण्यात आल्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपबिती कथन केली.
कशामुळे गमावली नोकरी ?
Reddit वर आपला अनुभव शेअर करताना त्या इंजिनिअरने लिहीलं की, रात्री 9 वाजताची मीटिंग त्याला नेहमीसारखीच कामाशी संबंधित चर्चा वाटली होती. मात्र, कॉल सुरू होताच HR ने कंपनीमध्ये इंटरनल स्ट्रेचिंग सुरू असल्याचं सांगत, कंपनीतल त्याचं काम संपल्याचं सांगितलं. हा निर्णय त्याच्या कामगिरीशी संबंधित नाही, असं HR ने स्पष्ट केलं होतं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे संपूर्ण इंजिनिअरिंग टीममध्ये भारतातून मी एकटाच कर्मचारी होता. त्याच्या टीममधील इतर कोणालाही कामावरून कमी करण्यात आले नाही, फक्त त्याला काढण्यात आलं. काही मिनिटांच्या या संभाषणाने मी पूर्णपणे हादरलो होतो. कोणतीही पूर्वसूचना किंवा मानसिक तयारीची संधी न मिळाल्याने हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होता, असं त्याने पोस्टमध्ये नमूद केलं.
आता नव्या नोकरीच्या शोधात
टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होत असल्याची मला जाणीव आहे. अशा परिस्थितीत नोकरी जाणं हे नेहमीच एखाद्याच्या कौशल्यावर किंवा कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, हेही त्याला मान्य आहे. मात्र, अचानक उत्पन्नाचं साधन आणि रोजचे काम गेलं, याचा धक्का पचवणं काही सोपं नाही, असंही त्याने या पोस्टमध्ये लिहीलं. आता मी माझा रिझ्युमे अपडेट करत असून नवीन नोकऱ्यांसाठी अर्ज तर करोतच आहे, पण त्यासोबतच मुलाखतीची तयारी करतोय. लवकरच एखाद्या चांगल्या कंपनीत नवीन संधी मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

Reddit युजर्सकडून मिळाला आधार
या पोस्टनंतर अनेक Reddit युजर्सनी आपले अनुभव शेअर करत त्याला धीर दिला. एका युजरने सांगितलं की, गेल्या वर्षी त्याच्यासोबतही अशाच प्रकारे अचानक नोकरी जाण्याचा प्रसंग घडला होता. कॉल संपल्यानंतर बराच वेळ तो सुन्न होऊन लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत बसला होता. मात्र, हा कठीण काळही निघून जाईल, असे त्याने लिहीत धीर दिला. मात्र दुसऱ्या एका युजरने तर त्याहूनही धक्कादायक अनुभव सांगितला. नियमित शिफ्ट संपल्यानंतर त्याने संध्याकाळी 6 वाजता लॉग आउट केलं होतं. रात्री दुसऱ्या दिवसाच्या सुट्टीबाबत अपडेट देण्यासाठी Slack उघडले असता त्याचा ID डिलीट झाल्याचे त्याला आढळलं. एवढेच नव्हे, तर त्याला WhatsApp वरूनही ब्लॉक करण्यात आलं होतं, असंही त्याने नमूद केलं.
