Shenbaz Shariff : ‘हा सज्जन माणूस नसता, तर…’, पाकिस्तानने हद्द केली राव, ट्रम्प यांच्या पायावर अक्षरश: शरीफ यांचं लोटांगण
Shenbaz Shariff : पाकिस्तानला जवळ करताना डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका त्यांना त्यांची लायकी दाखवून देतात. मात्र, तरीही पाकिस्तान अमेरिकेची कृपादृष्टी मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांचं कौतुक करताना खरोखर हद्दच केली आहे.

अमेरिकेला लाडीगोडी लावण्याची एक संधी पाकिस्तान सोडत नाही. पाकिस्तानने अक्षरश: डोनाल्ड ट्रम्प यांच्या चरणावर लोटांगण घातलं आहे. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होऊन आता चार दिवस झाले आहेत. आपल्याला हा पुरस्कार मिळावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी मनातली ही भावना वारंवार बोलूनही दाखवली. पण त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. हा शांती पुरस्कार जाहीर होण्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानने ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट केलं होतं. आता पुरस्कार जाहीर होऊन चार दिवस झाल्यानंतर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा नोबेलेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना नॉमिनेट केलं आहे. काहीही करुन अमेरिकेची कृपादृष्टी रहावी यासाठी पाकिस्तान वाट्टेल ते करायला तयार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या मते जगाला सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची आवश्यकता आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध विराम घडवून आणण्यात आपण महत्वाची भूमिका बजावली असा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे. वारंवार ते हा दावा करत असतात. गाझामध्ये शांततेसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिखर सम्मेलनात शहबाज शरीफ म्हणाले की, “मी या महान राष्ट्रपतीला नोबेल शांती पुरस्कारासाठी नॉमिनेट करतो. वास्तवात ते एक शानदार उमेदवार आहेत” “मला असं वाटतं तुम्ही ते व्यक्ती आहात, ज्यांची या क्षणाला सगळ्या जगाला गरज आहे. आधी 7 आणि आता 8 युद्ध थांबवण्यासाठी तुम्ही सर्वकाही केलं, म्हणून जग तुम्हाला लक्षात ठेवेल” असं शहबाज शरीफ म्हणाले.
‘काय झालेलं हे सांगायला कोणी शिल्लक राहिलं नसतं’
“जर, हा सज्जन माणूस नसता, तर कोणाला माहित काय झालं असतं. भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणवस्त्र शक्ती आहेत. जर, त्यांनी आपल्या शानदार टीमसह त्या चार दिवसात दखल दिली नसती, तर युद्ध अशा लेव्हलला गेलं असतं की, काय झालेलं हे सांगायला कोणी शिल्लक राहिलं नसतं” असं पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भरपूर इच्छा होती. त्यासाठी ते वारंवार बोलत सुद्धा होते. युद्ध थांबवल्याचे दाखले देत होते. अखेर पुरस्काराने मात्र त्यांना हुलकावणीच दिली.
