
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात शुक्रवारी रात्री एअरस्ट्राइक केला. यात तीन अफगाण क्रिकेटपटुंचा मृत्यू झाला. हे सर्व खेळाडू मैत्रीपूर्ण सामना खेळून एका स्थानिक सभेत सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या हल्ल्यात एकूण आठ लोकांचा मृत्यू झाला. जे अफगाणी क्रिकेटपटु या हल्ल्यात मारले गेले ते कोण होते?. या संदर्भात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक पोस्ट शेअर केली आहे. ACB नुसार, कबीर (Kabeer), सिबगातुल्ला (Sibghatullah) हारुन (Haroon) अशी या तीन क्रिकेटपटुंची नाव आहेत.ज्या क्रिकेटपटुंचा मृत्यू झाला ते पक्तिकाची राजधानी शरासनामध्ये एक फ्रेंडली मॅच खेळण्यासाठी गेले होते. घरी परतल्यानंतर उरगुन जिल्ह्याकत एक सभा सुरु असताना हा हल्ला झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, कबीर अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील एक युवा क्रिकेटर होता. त्याच्या करिअरबद्दल फार माहिती मिळालेली नाही. पण अफगाणिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. सिबगतुल्लाह बद्दल कमी माहिती आहे. पण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पोस्टवरुन हे स्पष्ट आहे की, हा युवा खेळाडू अफगाणिस्तान क्रिकेटच फ्यूचर होता.
हारुन खान कोण होता?
फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, हारुन खानचा जन्म 15 मार्च 2006 रोजी झाला. काबूलमधील तो एक डावखुरा फलंदाज होता. त्याने देशांतर्गत आणि एज-ग्रुप क्रिकेट टुर्नामेंटमधील प्रदर्शनाने लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केलेली. हारुन लिस्ट ए, टी 20 आणि प्रथम श्रेणीचे सामने खेळला होता. त्याच्याकडे अफगाणिस्तान क्रिकेटच उज्वल भविष्य म्हणून पाहिलं जायचं.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पक्तिकामध्ये मारल्या गेलेल्या लोकांबद्दल संवेदना प्रगट केली आहे. बोर्ड कुटुंबियांच्या दु:खात सहभागी झालं आणि दिवंगत आत्म्यांसाठी प्रार्थना केली. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर ACB ने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या तिरंगी टी 20 मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या टुर्नामेंटमध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तीन देशाच्या टीम्स खेळणार होत्या. अफगाणिस्तानातील स्टार क्रिकेटपटू राशिद खान, गुलदीन नईब, मोहम्मद नबी, फ़ज़लहक़ फ़ारूक़ी यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.