
टॅरिफ नीतिनंतर अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. असं असताना मधला मार्ग काढण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही देशांमधील ही चर्चा स्पेनमधील माद्रिद येथे होत आहे. दुसरीकडे, भारतात बंदी घातलेलं चीनी अॅप टिकटॉक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे. अमेरिकेतील चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकची अंतिम मुदत लवकरच संपणार आहे. यापूर्वी टिकटॉकला जानेवारी 2025 पर्यंतची वेळ देण्यात आली होती. त्यानंतर त्याचा कालावधी वाढवून 17 सप्टेंबर करण्यात आला. म्हणजेच ही मुदत आता काही तासांसाठी आहे असं म्हणावं लागेल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी न्यू जर्सी येथे पत्रकारांना संबोधित करताना टिकटॉकच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. पण आता ट्रूथवर पोस्ट करून आपलं मत स्पष्ट केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर पोस्ट करताना लिहिले की, “युरोपमध्ये अमेरिका आणि चीनमधील मोठी व्यापार बैठक खूप यशस्वी झाली! ती लवकरच संपणार आहे. एका खास कंपनीवरही करार झाला आहे जी आपल्या देशातील तरुणांना वाचवायची खूप इच्छा होती. त्यांना खूप आनंद होईल! मी शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी बोलेन. आमचे नाते अजूनही खूप मजबूत आहे!!!” 2024 मध्ये अमेरिकन संसदेने एक कायदा मंजूर केला होता. जर बाईटडान्सने आपला अमेरिकन हिस्सा विकला नाही तर टिकटॉकवर बंदी घातली जाईल. 19 जानेवारी 2025 रोजी चीनच्या बाइटडान्स कंपनीच्या टिकटॉकवर कायदेशीररित्या बंदी घातली. त्यानंतर ही मुदत वाढवली होती.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये म्हणाले होतं की, टिकटॉक बंद होईल की त्याची अंतिम मुदत वाढवली जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. अमेरिकेत टिकटॉक सुरु राहील की नाही हे पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. पण मुलांना टिकटॉक खूप आवडते. यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर भाष्य केलं होतं. ऑगस्ट महिन्यात केलेल्या वक्तव्यात ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकन कंपन्या टिकटॉक खरंदी करण्यास तयार आहेत. त्यांना टिकटॉक वाचवायचं आहे. पण नियमानुसार, कोणत्याही अमेरिकन खरेदीदाराला टिकटॉक खरेदी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे.