माझ्या मित्राशी पंगा घेऊ नका… ट्रम्प यांचा गल्फ नेत्यांना थेट इशारा, खास मित्र कोण?
न्यूयॉर्कमधील मध्य पूर्वेतील नेत्यांसोबतच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची प्रचंड स्तुती केली. एर्दोगनना 'टफ कुकी' आणि 'मित्र' संबोधत ट्रम्प यांनी इतरांना त्यांच्याशी वैर न करण्याचा इशारा दिला. या अप्रत्याशित मैत्रीची जगभर चर्चा सुरू असून, यामुळे मध्य पूर्वेतील राजकारण आणि अमेरिका-तुर्की संबंधांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमध्ये मध्य पूर्वेतील नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक केली आहे. यावेळी त्यांनी तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन यांची प्रचंड स्तुती केली. एवढेच नव्हे तर एर्दोगन हे आमचे मित्र आहेत, असं असंही ट्र्म्प म्हटलं आहे. तसेच एर्दोगन यांचा उल्लेख टफ कुकी म्हणजे अत्यंत कठोर व्यक्ती असा उल्लेखही त्यांनी केला आहे. तसेच एर्दोगन यांच्याशी पंगा घेऊ नका, नाहीतर योग्य होणार नाही, असा इशाराच ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे ट्रम्प आणि एर्दोगन यांच्या मैत्रीची जगभर चर्चा सुरू झाली आहे.
जीसीसीच्या या बैठकीला इराकचे पंतप्रधान अली अल जैद, जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय, कतरचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी, सीरियाचे राष्ट्रपती अहमद अल शरा यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी एर्दोगन यांच्यावर कौतुकांचा जणू वर्षावच केला. इतकंच नाही तर त्यांनी एर्दोगन यांच्याशी कुणीही वैर न करण्याचा इशाराही दिला.
आमचं बोलणं योग्य प्रकारे…
ही बैठक अत्यंत खेळीमेळीत पार पडली. स्वत: ट्रम्पही थट्टामस्करीच्या मूडमध्ये होते. एर्दोगन आणि माझ्यात झालेली चर्चा योग्य पद्धतीने ट्रान्स्लेट झाली असेल अशी मला आशा आहे, असं मिश्किल विधान ट्रम्प यांनी यावेळी काढलं. त्यामुळे एकच खसखस पिकली. एर्दोगन हे एक फँटास्टिक आणि शानदार व्यक्ती आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
परिणाम लवकरच दिसतील
एर्दोगन हे आपले सच्चे मित्र असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्हाला एर्दोगन यांच्यासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे. मध्य पूर्वेतील वेगवेगळ्या भागात युद्धजन्य परिस्थिती आहे. अशावेळी ट्रम्प यांनी केलेल्या विधानाला अत्यंत महत्त्व आलं आहे.
आमच्यात चांगली चर्चा झाली. या चर्चेचे परिणाम लवकरच दिसू लागेल, असं एर्दोगन म्हणाले. बैठकीनंतर न्यूयॉर्कमध्ये तुर्की हाऊसच्या बाहेर एर्दोगन यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही तुर्की आणि इतर दुसऱ्या देशांसमोर असलेली आव्हानं दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आमचं काम सुरू आहे, असं एर्दोगन म्हणाले. सुमारे आठ देशांनी गल्फमधील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचे परिणाम येत्या काळात दिसून येतील, असंही त्यांनी सांगितलं.
