
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल, शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी केलेल्या एका विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अंधारमय चीनसमोर अमेरिकेने भारत आणि रशियाला गमावल्यासारखं वाटतं असल्याची खोचक टिप्पणी त्यांनी केली. मात्र त्यांच्या या विधानाला 24 तासही उलटत नाहीत तोच अचानक त्यांचे सूर बदलले आहेत. इतके दिवस भारतावर तोफ डागणाऱ्या, टॅरिफ लावत भारताला सतावणाऱ्या ट्रम्प यांना अचानक प्रेमाचा उमाळा आला. नरेंद्र मोदींचा मी नेहमी मित्र राहीन, ते एक महान पंतप्रधान आहेत, पण सध्या मला त्यातं काम आवडत नाहीये, असं ट्रम्प म्हणाले होते.
आम्ही भारतावर खूप जास्त कर लादले आहेत. तथापि, माझे पंतप्रधान मोदींशी खूप चांगले संबंध आहेत, ते खूप चांगले आहेत, असं ट्रम्प म्हणाले. अचानक घूमजाव करत ट्रम्प यांचे सूर कसे बदलले, त्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया..
1. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवलं नाही
अमेरिकेने 27 ऑगस्टपासून भारतावर 50% कर लादला. यापैकी 25% कर दंड म्हणून लावण्यात आला, कारण भारत गेल्या बऱ्याच काळापासून रशियाकडून तेल खरेदी करत आहे. मात्र यामुळे रशियाला युद्धात मदत होत आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मात्र ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही. हा राष्ट्रीय हिताचा निर्णय आहे आणि जगभरात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत झाली आहे असं भारताचे म्हणणं आहे.
टॅरिफद्वारे अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. (भविष्यात) भारत रशियन तेल खरेदी करत राहील असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 5 सप्टेंबर रोजी सांगितलं. आपल्या गरजेनुसार आपल्याला तेल कुठून खरेदी करायचे आहे हे आपण ठरवावे लागेल. हा आपला निर्णय असेल असेही त्यांनी नमूद केलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही हे यापूर्वी अनेक व्यासपीठांवर सांगितलं होतं.
2. जागतिक स्तरावर वाढली भारताची सक्रियता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑगस्ट रोजी तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेला हजेरी लावली, तिथे त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. SCO शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदींनी हे सिद्ध केले की भारत बहुपक्षीय व्यासपीठांवर सक्रिय आहे आणि प्रत्येक आघाडीवर आपली उपस्थिती दाखवत आहे. यामुळे भारताची भूमिका स्पष्ट आणि मजबूत आहे असा संदेश अमेरिकेलाही गेला.
3. भारताने अमेरिकन शेती उत्पादनांवरील कर कमी केले नाहीत
भारत आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करार (BTA) बाबत कोणताही करार झालेला नाही. अमेरिका बऱ्याच काळापासून भारतावर, त्यांच्या शेती आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली करण्यासाठी दबाव आणत आहे. अमेरिकन कृषी उत्पादनांवरील कमी कर आकारण्याची अमेरिकेची मागणी भारताने नाकारली. जास्त किमती असूनही भारताने स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले.
4. ब्रिक्स समिटमध्ये भारताचा सहभाग
8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या व्हर्च्युअल ब्रिक्स शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतील. ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ही शिखर परिषद बोलावली आहे. अमेरिकन टॅरिफला कोणत्या मार्गांनी सामोरे जायचे यावर या परिषदेत चर्चा केली जाईल. अमेरिकेने भारताप्रमाणेच ब्राझीलवरही 50% कर (टॅरिफ) लादला आहे. ब्राझील सध्या ब्रिक्सचा अध्यक्ष आहे. 10 देशांच्या गटात भारत, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही समावेश आहे.
5. ट्रम्पविरोधात अमेरिकेत नाराजी
ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी 28 ऑगस्ट रोजी रशिया-युक्रेन संघर्षाला मोदींचे युद्ध म्हटले होते. भारत रशियाकडून तेल खरेदी करून या युद्धाला खतपाणी घालत आहे असा आरोप नवारो यांनी केला होता. 31 ऑगस्ट रोजी ते म्हणाले, भारत हे क्रेमलिनसाठी मनी लाँडरिंग मशीनपेक्षा वेगळे काही नाही. ब्राह्मण भारतीय लोकांच्या खर्चावर नफा कमवत आहेत. आपल्याला हे थांबवावे लागेल असं खळबळजनक विधान त्यांनी केलं होतं.
मात्र अमेरिकेत राहणाऱ्या हिंदूंनी नवारोच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. अमेरिकेचे माजी एनएसए जेक सुलिव्हन यांनीही ट्रम्पच्या टॅरिफच्या निर्णायाला अमेरिकेच्या हिताचे मोठे धोरणात्मक नुकसान म्हटलं होतं. सध्या भारतात जे घडत आहे त्याचा जगभरातील आपल्या सर्व संबंधांवर आणि भागीदारीवर खोलवर परिणाम होत आहे. अमेरिका-भारत यांच्यातील मजबूत संबंध आपल्या हिताचे आहेत असं सुलिव्हन म्हणाले होते.
एकंदरीतच अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या इशाऱ्यावर आपले परराष्ट्र धोरण पाळणार नाही असे भारताने स्पष्ट केलं आहे. भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांना संदेश गेला आहे की भारत आता पॉवर बॅलन्सरच्या भूमिकेत आहे.