
TTP In Pakistan : पाकिस्तान हा देश नेहमीच आपल्या शेजारच्या देशांसोबत काहीतरी कुरापती करत असते. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानात आतापर्यंत अनेक कट रचण्यात आले आहेत. हाच देश अफगाणिस्तान या शेजारी राष्ट्रालाही डिवचत असतो. नुकतेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्लेही केले. दरम्यान, आता याच अफगाणिस्तानातून पाकिस्तानविरोधी कारवाया करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या काही भागावर ताबा मिळवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांच्या सीमेजवळ पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा नावाचा प्रांत आहे. याच प्रांतातील अनेक जिल्ह्यांत तहरीक ए तालिबान पाकिस्तान तसेच या संघटनेशी संबंधित असलेल्या इतर दहशतवादी संघटनेने आपला विस्तार केला आहे. या संघटनेने पाकिस्तानचा काही भाग आपल्या ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या भागात पाकिस्तान सैनिकांचे येणे-जाणे कठीण होऊन बसले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असलेल्या डुरँड लाईच्या आसपासचा मोठा भाग टीटीपी संघनटेने आपल्या ताब्यात घेतला आहे.
सध्या खैबर, कुर्रम, उत्तरी दक्षिणी वजीरिस्तान आणि बाजौर हे भाग पाकिस्तान लष्करासाठी नो झोन बनले आहेत.
म्हणजेच पाकिस्तानी लष्कराला या भागात जाता येत नाहीये. इथे टीटीपी या संघटनेने आपल्या काही चौक्या उभ्या केल्या आहेत. सोबतच टीटीपीचे सदस्य या भागातील वाहनांची खुलेआम तपासणी करत आहेत. सोबतच पेशावर-खैबर रोड, हंगरू-खुर्रम कॉरिडोर आणि बन्नू-डेरा इस्माइल खान या भागातील रस्त्यांवर टीटीपीचे सदस्य खुलेआम जिहादच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेत आहेत. या दहशतवाद्यांनी याचे काही व्हिडीओ समाजमाध्यमावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
टीटीपीचे हे कृत्य म्हणजे पाकिस्तानी सरकार तसेच पाकिस्तान लष्करासाठी खुले आव्हान असल्याचे बोलले जात आहे. अगोदर टीटीपीचे सदस्य डोंगर प्रदेशात तसेच ग्रामीण भागात राहायचे. आता हे सदस्य पेशावरच्या आजसपास दिसू लागले आहेत. बदाबेर, मत्तानी आणि बारा रोड या भागात TTP चे नेटवर्क चांगलेच सक्रिय झाले आहे. टीटीपीचा हा विस्तार पाकिस्तानातील सुरक्षेसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पाकिस्तानाल खैबर पख्तुनख्वा हा प्रदेश सोडून द्यावा लागतो की काय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सेना, पाकिस्तानी सरकार नेमके काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.