एका व्यक्तीमुळे लागली भीषण आग, अनेक गावे जळून खाक, शेतीचे मोठे नुकसान
तुर्कीच्या जंगलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीचा परिणाम शेजारीस ग्रीस, बल्गेरिया आणि मॉन्टेनेग्रो या देशांवरही झाला आहे.

तुर्कीच्या जंगलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे जवळपास 3500 पेक्षा जास्त लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. या घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या आगीचा परिणाम शेजारीस ग्रीस, बल्गेरिया आणि मॉन्टेनेग्रो या देशांवरही झाला आहे. तुर्कीतील बुर्साच्या आसपास असणाऱ्या जंगलातील पर्वतांवर ही आग पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार इझमीर प्रदेश आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ही आग पसरताना दिसत आहे. या आगीत आतापर्यंत 15 हजार हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले आहे. एका व्यक्तीने जुन्या गाद्या जाळल्यामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे, त्यामुळे आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
बुर्साच्या जंगलात या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. या आगीमुळे आकाशात फक्त ज्वाला दिसत आहेत. इझमीर आणि बिलेसिक या राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तुर्कीचे वनमंत्री इब्राहिम युमाकाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे बुर्साच्या ईशान्येकडील अनेक गावांमधून 3515 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या 1900 पेक्षा जास्त अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीमुळे बुर्सा ते राजधानी अंकाराला जोडणारा महामार्ग देखील बंद करण्यात आला आहे.
जुन्या गाद्या जाळल्याने लागली आग
समोर आलेल्या माहितीनुसार ही आग एका व्यक्तीने जुन्या गाद्या जाळल्यामुळे लागली आहे. यानंतर आता सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली आहे. साकर्या येथे जुन्या गाद्या जाळल्यामुळे ही आग लागली आणि नंतर ती संपूर्ण जंगलात पसरली.
आगीमुळे अनेक गावांचे नुकसान
तुर्कीतील बुर्सा या भागात 3 हजार एकर जंगलात ही आग पसरली आहे. यात शेती आणि निवासी क्षेत्रांचाही समावेश आहे. तसेच इझमीरच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे हजारो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. बुर्सा आणि इझमीरसह इतर काही जिल्ह्यांमधील सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे.
दोघांचा मृत्यू
बुर्साचे महापौर मुस्तफा बोझबे यांनी या आगीबाबत सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवतावा एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तसेच टँकर दरीत पडल्यामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
जंगलात पसरली राख
तुर्कीमध्ये पाइनची जंगले असलेल्या भागात आता सर्वत्र राख पसरली आहे. वनमंत्री युमाकाली यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिमेकडील प्रदेशाला सर्वाधिक धोका आहे, या भागातील 1839 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आग आणखी भडकण्याचीही शक्यता आहे.
