
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारतासोबतच्या सध्याच्या तणावामध्ये मोठे भाष्य केले आहे. काही दिवसांपासून अमेरिकेकडून भारताबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यामध्येच आता अमेरिका एक पाऊल मागे भूमिका घेताना दिसत आहे. हेच नाही तर सध्याच्या व्यापार तणावात अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले की, दोन्ही महान देश आहेत आणि समाधान काढतील. अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारताबद्दल केलेल्या विधानाने जगाच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण अमेरिकेकडून भारताबद्दल कधी टीका तर कधी काैतुक केले जात आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप जास्त मजबूत आहेत. मनापासून वाटते की, शेवटी आम्ही एकत्र येऊ. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले संबंध आहेत. हा विषय फक्त रशियाच्या तेलाचा नाहीये. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकतंत्र देश आहे आणि अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था. मला वाटते की, शेवटी आम्ही एकत्र येणार आहोत.
यासोबतच चीनमधील संमेलनाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, मला वाटते की, हे संमेलन पूर्वनियोजित होते. मात्र, बऱ्याच गोष्टी तिथे फक्त दाखवण्यासाठी केल्या जातात. भारत हा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे आणि मला वाटते की, रशिया, चीन यांच्या तुलनेत भारत हा आमच्या अधिक जवळचा आहे. मात्र, त्यांनी रशियाच्या तेलाबद्दल बोलताना म्हटले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतोय आणि त्याला विकतोय मला असे वाटते की, हा व्यवहार त्यांचा चांगला नाहीये.
अर्थमंत्री स्कॉट बेसेंट हे भारताचे थेट काैतुक करताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार भारतावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आले. हेच नाही तर रशियाने हे देखील स्पष्ट केले की, भारतीय वस्तूंचे आम्ही आमच्या देशात मोठ्या प्रमाणात स्वागत करू.