युद्धविरामानंतर अवघ्या काही तासांतच भडकले ट्रम्प, आगपाखड करत दिली मोठी धमकी, जगाचं टेन्शन पुन्हा वाढलं..

इराण-अमेरिका युद्धविराम घोषणेनंतरही आंतरराष्ट्रीय राजकारणात नवे वादळ उठले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड मिळवण्याची इच्छा व्यक्त करत नाटोवरही नाराजी व्यक्त केली आहे. इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर अमेरिकेचा युरोपीय मित्र राष्ट्रांशी तणाव वाढला आहे. यामुळे जागतिक भू-राजकीय स्थिती गुंतागुंतीची झाली असून, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

युद्धविरामानंतर अवघ्या काही तासांतच भडकले ट्रम्प, आगपाखड करत दिली मोठी धमकी, जगाचं टेन्शन पुन्हा वाढलं..
डोनाल्ड ट्रम्प भडकले
Image Credit source: Tom Williams/CQ-Roll Call, Inc via Getty Images
| Updated on: Apr 09, 2026 | 9:52 AM

40 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका युद्धादरम्यान, काल मोठी घोषणा झाली. दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली, दोन आठवड्यांसाठी हल्ले होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच इस्रायलने लेबनॉनवर हल्ला चढवला, ज्यात शेकडो लोक ठार झाले. यामुळे इराण पुन्हा भडकला असून त्यांनी होर्मुजची सामुद्रधुनी बंद केली आहे. दरम्यान एकीकडे इराणशी असलेलं युद्ध थांबवत युद्दविरामाची घोषणा केल्यानंतरही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे पुन्हा भडकले आहेत. मात्र यंदा त्यांच्या निशाण्यावर आहे ग्रीनलँड. एवढंच नव्हे तर तर इराण युद्धात साथ न दिल्यामुळे ट्रम्प यांनी नाटोवर आगपाखड केली आहे. तसेच ग्रीनलँड मिळवण्याच्या आपल्या इच्छेचाही ट्रम्पनी पुनरुच्चारही केला. इराणशी सुरू असलेल्या युद्धा दरम्यान शस्त्रसंधी, युद्धविरामाची घोषणा केल्यावर अवघ्या एका दिवसात ट्रम्प यांचे हे वक्तव्य आलं आहे. ग्रीनलँडवरील ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे युरोपसोबतचा तणाव वाढू शकतो.

नाटोच्या महासचिवांसोबत झाली मीटिंग

इराण युद्धातील युद्धविरामाच्या घोषणेनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी नाटोचे महासचिव मार्क रुटे यांची भेट घेतली. एका खोलीत बंद दाराआड झालेल्या या भेटीदरम्यान, इराण युद्धाच्या काळात नाटो लष्करी आघाडीकडून पाठिंबा न मिळाल्याबद्दल ट्रम्प यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. या बैठकीपूर्वी, जेव्हा युद्धादरम्यान इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तेव्हा ट्रम्प यांनी असे संकेत दिले होते की, जर नाटो सदस्य देशांनी त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले तर अमेरिका नाटोमधून बाहेर पडण्याचा विचार करू शकते. तर काल नाटोच्या महासचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावरही आपली नाराजी व्यक्त केली. “जेव्हा आम्हाला त्यांची गरज होती तेव्हा नाटो आमच्यासोबत नव्हते, आणि भविष्यातही गरज पडल्यास ते आमच्यासोबत नसतील.”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं. व्हाईट हाऊसने यावर तात्काळ कोणतीही अधिक माहिती दिली नाही.

नाटोवर भडकलेत ट्रम्प

मार्क रुटे यांच्यासोबतच्या भेटीपूर्वी, ट्रम्प यांनी संकेत दिले होते की अमेरिका ट्रान्सअटलांटिक अलायन्स (नाटो) मधून बाहेर पडण्याचा विचार करू शकते. नाटो सदस्य राष्ट्रांनी इराणमधील मदतीच्या आवाहनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र असं असलं तरी त्यांनी अद्याप तरी नाटोमधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

मंगळवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे) अमेरिका आणि इराण दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमत झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची रुट्टे यांच्यासोबत बैठक झाली. इराणसोबत झालेल्या या शस्त्रसंधीच्या अटींमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचा समावेश होता. 28 फेब्रुवारीच्या अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला चढवत युद्धाला तोंड फोडल्यानंतर हा सागरी मार्ग बंद झाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला.

ग्रीनलँडवर का आहे ट्रम्प यांची नजर ?

इराणसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ग्रीनलँड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आर्क्टिक प्रदेशातील ग्रीनलँडच्या, मोक्याच्या स्थानामुळे महत्त्वाचे सागरी व्यापारी मार्ग आणि संभाव्य ऊर्जा साठे उपलब्ध होतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रदेश आपल्यात सामील करून घेण्याचे वारंवार संकेत दिले आहेत. मात्र ग्रीनलँडची सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण डॅनिश नियंत्रणाखाली आहे. डेन्मार्कने डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांना तीव्र विरोध दर्शवला. ग्रीनलँडला जोडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न नाटोसाठी धोकादायक आहे, असं डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी म्हटलं. तसेच इतर युरोपीय देशांनीही यावर आपला आक्षेप व्यक्त केला आहे.

युरोप-अमेरिकेत वाढू शकतो तणाव

विश्लेषकांच्या मते, ग्रीनलँड हे आर्क्टिक निगराणी, क्षेपणास्त्र संरक्षण आणि सागरी मार्गांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, जे बर्फ वितळल्यामुळे अधिक सुलभ होत आहे. आर्क्टिकमध्ये अमेरिकेचा प्रभाव प्रस्थापित करण्याची ट्रम्प यांची इच्छा असून त्यांचं विधानेच दर्शवतं, पण यामुळे अमेरिकेच्या युरोपीय मित्र राष्ट्रांसोबत तणाव निर्माण होणे अटळ आहे.

Follow Us