
इंडोनेशियाची राजधानी जकार्तासह देशातील प्रमुख शहरांमध्ये आंदोलन सुरु आहे. गेल्या एका आठवड्यापासून आदोलक आंदोलन करत आहेत, मात्र आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दक्षिण टांगेरंगमध्ये शेकडो आंदोलकांनी अर्थमंत्री मुलयानी इंद्रावती यांच्यासह अनेक नेत्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यातील मौल्यवान वस्तू लुटल्या. यावेळी आंदोलकांनी येथे असलेल्या सुरक्षा रक्षकांवरही हल्ला केला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील 580 खासदारांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा 50 लाख रुपये (सुमारे 3075 डॉलर्स) घर भत्ता मिळत असल्याचे समोर आले होते. ही रक्कम खूप जास्त आहे. देशात सध्या महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. मात्र खासदारांवर पैसे उधळले जात असल्याचे लक्षात येताच सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आणि निदर्शने करू लागले. आता नागरिक मंत्री आणि खासदारांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना त्यांचा चीन दौरा रद्द करावा लागला आहे.
खासदारांविरोधात आंदोलन सुरु असताना 29 ऑगस्ट रोजी जकार्तामध्ये संतप्त आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता. यावेळी पोलिसांच्या एका वाहनाना एका डिलिव्हरी रायडरला चिरडले होते. या घटनेमुळे सुराबाया, योग्यकर्ता, मेदान, मकास्सर, मानाडो, बांडुंग आणि पापुआ येथील लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. काही ठिकाणी सिग्नल तोडण्यात आले, तसेच रस्ते अडवले गेले, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
आज आंदोलकांनी अर्थमंत्री मुलयानी इंद्रावती यांचे घर लुटले. तसेच दक्षिण टांगेरंगमधील नासदेम खासदार आणि अभिनेत्री नाफा उर्बक यांच्या घरावरही जमावाकडून हल्ला करण्यात आला. यावेळी लोकांनी घराची तोडफोड करत मौल्यवान वस्तू लुटल्या. पूर्व जकार्तामधील ड्युरेन सावित येथेही आंदोलकांनी होस्ट उया कुया यांचे घर लुटले. आंदोलकांनी दक्षिण जकार्तामध्ये आमदार इको पॅट्रिओ यांच्या घराचीही तोडफोड केली. लोकांनी घरातून कपडे, रेफ्रिजरेटर आणि एलपीजी गॅस सिलिंडर देखील उचलून नेले.