
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध विराम व्हावा यासाठी आता अमेरिकेकडून रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळेच रशिया आणि अमेरिकेचे संबंध आता पूर्वीपेक्षा अधिक बिघडले आहेत. दुसरीकडे रशियाकडून वारंवार नाटो देशांना आव्हान देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रशियानं पोलंडमध्ये आपली लढाऊ विमानं घुसवली होती, यावरून नाटो देश आणि रशिया आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं, नाटोकडून रशियाला इशारा देखील देण्यात आला होता, मात्र पोलंडनंतर रशियानं आपली विमानं एस्टोनियाच्या हवाई हद्दीत घुसवली जवळपास बारा मिनिटं ही लढाऊ विमानं एस्टोनियाच्या हवाई हद्दीमध्ये होती. दरम्यान त्यानंतर आता रशियानं उचललेल्या पावलांमुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून, नाटो देशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
रशियाच्या लढाऊ आणि बॉम्ब वाहक विमानांनी आता थेट अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. रशियन विमानांकडून अलास्कामध्ये असलेल्या एअर डिफेन्स क्षेत्राला निशाणा बनवण्यात आलं, मात्र अमेरिकेच्या वायुदलानं कॅनडासोबत संयुक्त मिशन राबवून रशियन विमानांना आपल्या हवाई क्षेत्रातून बाहेर काढलं, त्यानंतर आता अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की यानंतर एकही रशियाचं विमान आमच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाही. दरम्यान ही घटना अशावेळी घडली आहे, जेव्हा रशियानं यापूर्वीच काही नाटो देशांच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली आहे. त्यानंतर आता रशियानं आपला मोर्चा थेट अमेरिकेकडं वळवल्यानं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
अमेरिकेकडून F-16 तैनात
अमेरिकेनं अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार रशियाचे दोन मोठे बॉम्ब वाहक विमानं टीयू-95 आणि दोन लढाऊ विमानं Su-35 बुधवारी अलास्काच्या हवाई क्षेत्रामध्ये घुसले होते. त्यानंतर आम्ही ताबडतोब प्रत्युत्तर देत F-16 लढाऊ विमानांच्या मदतीनं त्यांना हवाई क्षेत्राच्या बाहेर काढलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या वायू दलाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार एअर डिफेन्स क्षेत्र हे कोणत्याही देशाच्या हवाई क्षेत्रापासून काही अंतर दूर असतं. त्यामुळे अशा घटनांमुळे कोणताही धोका होत नाही.