Pakistan: आम्ही भारताची 7 विमाने पाडली, पाकिस्तानी पंतप्रधानांचा संयुक्त राष्ट्रांच्या भाषणात खोटारडा दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80 व्या अधिवेशनात भाषण केले दिले. यावेळी त्यांनी आम्ही भारताची 7 विमाने पाडली असा खोटारडा दावा केला आहे.

Pakistan: आम्ही भारताची 7 विमाने पाडली, पाकिस्तानी पंतप्रधानांचा संयुक्त राष्ट्रांच्या भाषणात खोटारडा दावा
shahbaz
| Updated on: Sep 26, 2025 | 8:46 PM

भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविले होते. या अंतर्गत भारतीय सैन्याने शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या युद्धात भारतीय सैन्यासमोर पाकिस्तानने गुढगे टेकले होते. अशातच आज पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80 व्या अधिवेशनात भाषण केले दिले. यावेळी त्यांनी पाकिस्तानसारख्या देशांसाठी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण शांतता आणि आदरावर आधारित आहे. सर्व वाद संवाद आणि समजुतीने सोडवले पाहिजेत असं शरीफ यांनी म्हटलं आहे.

शाहबाज शरीफ आपल्या भाषणात म्हणाले की, ‘काश्मिरी लोकांना आत्मनिर्णयाचा त्यांचा मूलभूत अधिकार देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली, निष्पक्ष यंत्रणेद्वारे तोडगा काढला पाहिजे अशी पाकिस्तानची भूमिका आहे.’ मात्र भारताने याआधी अनेकदा स्पष्ट केले आहे की, जम्मू आणि काश्मीर हा अंतर्गत मुद्दा आहे. यात इतर कोणत्याही देशांने हस्तक्षेप करु नये.

पहलगाम हल्ल्याबाबतही भाष्य

शाहबाज शरीफ पुढे बोलतान म्हणाले की, ‘गेल्या वर्षी मी म्हटले होते की जर कोणी पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. मे महिन्यात आमच्या पूर्व सीमेवर विनाकारण हल्ला झाला. आम्ही शत्रूचा पराभव केला आणि त्यांना परत पाठवले. आमच्या सैनिकांनी मोठे शौर्य दाखवले. भारताने या मुद्द्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र तरीही भारताने आमच्या निष्पाप लोकांवर हल्ला केला. आम्ही बचावात्मत हल्ला केला जे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार योग्य आहे. आमच्या हवाई दलाने 7 भारतीय विमाने पाडली.’

ट्रम्प यांचे आभार मानले

शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘हा विजय आमच्या शहीदांच्या शौर्यामुळे मिळाला आहे. आम्ही त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तान खंबीरपणे एकत्र उभा राहिला आणि युद्धबंदी स्वीकारली. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी भूमिका बजावली. आम्हाला एका मोठ्या युद्धापासून वाचवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. जर त्यांची वेळेवर मदत मिळाली नसती तर मोठे नुकसान होऊ शकले असते. त्यामुळे आम्ही ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.’

दरम्यान, भारताने याआधीच युद्धबंदीसाठी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केल्याचा आरोप फेटाळलेला आहे. दोन्ही देशांमधील संघर्षात पाकिस्तानला अनेक देशांनी साथ दिली होती. त्या देशांचेही शरीफ यांनी आभार मानले. शरीफ म्हणाले की, ‘आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी चीन, तुर्की, सौदी अरेबिया, कतार, अझरबैजान, इराण, युएई आणि संयुक्त राष्ट्रांचे आभार मानतो. आता आमचे ध्येय या प्रदेशात शांतता प्रस्थापित करणे आहे. आम्ही भारतासोबत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.’