Iran Israel War : इराण की इस्रायल, सीजफायरसाठी पहिला पुढाकार कोणी घेतला?
Iran Israel War : मागच्या 12 दिवसांपासून मध्यपूर्वेत इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेलं युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर सुद्धा इराणकडून हल्ले करण्यात आले. पण आता तोडगा दृष्टीपथात आल्याच दिसत आहे. पण सीजफायरसाठी पहिला पुढाकार कोणी घेतला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान मंगळवारी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला. 12 दिवसाच्या युद्धानंतर इराण-इस्रायलमध्ये सीजफायर घडवून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. पण ट्रम्प यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. कारण इराणने त्यांचा दावा फेटाळून लावला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी इस्रायलसोबतच सीजफायरच वृत्त फेटाळून लावलं. इस्रायलोसबत अजून कुठलाही युद्धविरामाचा करार झालेला नाही. इस्रायलने इराणवर हल्ले थांबवले, तर इराण सुद्धा हल्ले थांबवेल असं अब्बास अरागची म्हणाले.
कतरमध्ये अमेरिकी बेसवर हल्ला केल्याच इराणने जाहीर केल्यानंतर काहीवेळाने ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. रविवारी इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्याचा हा बदला होता, असं इराणने म्हटलं. “आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमने इराणी मिसाइल्स हवेतच नष्ट केली. काहीही नुकसान झालं नाही” असं कतरच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. इराणने हा हल्ला करण्याआधी पूर्वसूचना दिली होती असं सुद्धा म्हटलं जात आहे.
ट्रम्प यांनी काय दावा केलेला?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिलय की, “इराण आणि इस्रायल दोघे एकत्र माझ्याकडे आले आणि आम्हाला शांतता हवी असं सांगितलं. मला माहित होतं, आता वेळ आलीय” ट्रम्प यांनी पुढे लिहिलय की, ‘हा संपूर्ण जग आणि मध्य पूर्वेसाठी मोठा विजय आहे’
“आता दोन्ही देश शांतता आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु शकतात. फक्त त्यांनी प्रामाणिकपणा आणि धार्मिकतेच्या मार्गावर टिकून रहावं. सीजफायर 6 तासांनी लागू होणार असं ट्रम्प म्हणाले. पहिल्या 12 तासांनी इराण शस्त्र ठेवेल नंतर इस्रायल” असं ट्रम्पनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी दावा केला की, असा कुठलाही शांती करार झालेला नाही.
भारत-पाकिस्तानच्यावेळी सुद्धा असाच दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी असा मध्यस्थतेचा पहिल्यांदा दावा केलेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम अमेरिकेच्या मध्यस्थीने झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. भारताने सुद्धा त्यावेळी हा दावा फेटाळून लावलेला. युद्धाविराम दोन्ही देशाच्या चर्चेनंतर झाल्याच म्हटलं होतं.
