
युद्ध म्हटले की आपल्या डोळ्या समोर सीमेवर लढणारे सैनिक, आकाशातून पडणाऱ्या मिसाईल या सर्व गोष्टी दिसतात. आपण युद्धाला भीती आणि अनिश्चिततेशी जोडतो. पण तेहरानच्या ऑनलाइन बाजारात एक विचित्र चित्र पाहायला मिळाले. जूनमध्ये 12 दिवस चाललेल्या इराण-इस्रायल संघर्षादरम्यान लोक शस्त्रांपासून संरक्षण मिळवण्याऐवजी वैद्यकीय संरक्षण शोधत होते. इराणच्या सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म डिजीकालाच्या अहवालानुसार, युद्धादरम्यान कंडोमच्या खरेदीत 26 टक्क्यांनी वाढ झाली. नाही का, ही रंजक गोष्ट आहे? आता युद्ध आणि कंडोम विक्री यामध्ये नेमकं कनेक्शन काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जसजसे इस्रायली क्षेपणास्त्रे इराणच्या भूमीवर पडत होती, तसतसे सामान्य लोक ऑनलाइन बाजारात सॅनिटरी पॅड, सॅनिटायझर, रक्तातील साखर मॉनिटर, वैद्यकीय बँडेज, प्रौढ डायपर आणि अंडरपॅड यासारख्या आवश्यक वस्तू खरेदी करत होते. पण यात सर्वात आश्चर्यकारक ट्रेंड होता तो म्हणजे कंडोमच्या विक्रीत सातत्याने वाढ. अनिश्चिततेच्या वातावरणात लोकांनी सर्वाधिक खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये कंडोमचाही समावेश होता.
इराणमध्ये युद्धकाळात कंडोमच्या विक्रीत वाढ
तज्ज्ञांच्या मते, युद्धाच्या परिस्थितीत लोक जीवनाच्या मूलभूत गरजा आणि वैयक्तिक सुरक्षेशी संबंधित वस्तूंचा साठा करू लागतात. यामुळेच आरोग्य उत्पादनांची मागणी वाढते. पण कंडोमच्या मागणीत अचानक झालेली वाढ ही रंजक आहे. जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला सुरू केला, तेव्हा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वस्तूंची विक्री वाढू लागली. एकूण 12 दिवसांच्या या संघर्षादरम्यान वैद्यकीय वस्तूंमध्ये कंडोमचीही भरपूर खरेदी झाली. पण ही फक्त इराणची कहाणी नाही, तर जगभरात संकटकाळात असाच पॅटर्न दिसून आला आहे.
जिथे-जिथे युद्ध, तिथे कंडोमच्या विक्रीत वाढ
इराणच्या एका वेबसाइट, इराण इनटेलमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ऑक्टोबर 2006 मध्ये उत्तर कोरियाच्या अणुचाचणीनंतर तिथे दररोज सरासरी 1,930 कंडोम विकले जाऊ लागले. तर यापूर्वी ही संख्या 1,508 होती. मार्च 2022 मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या फार्मसी चेन Rigla मध्ये विक्री 26 टक्क्यांनी वाढली, तर ऑनलाइन प्लॅटफॉर्म Wildberries वर कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. केवळ युद्धच नाही, तर कोविड-19 महामारीच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत Reckitt Benckiser सारख्या कंपन्यांनी कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले होते.