Iran-US : इराणमध्ये टॅक्सी ड्रायव्हरच्या घरावर अमेरिकेने का टाकला 907 किलोचा बॉम्ब?
Iran-US : इराण-अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या युद्धात अमेरिकेने एका टॅक्सी ड्रायव्हरच्या घरावर तब्बल 907 किलोचा मोठा बॉम्ब टाकल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेने हे असं का केलं? त्याचं कारण काय?

इराणने अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याबद्दल एक नवीन खुलासा झाला आहे. मागच्या आठवड्यात अमेरिकेने केशम बेटाजवळ एका इराणी टॅक्सी ड्रायव्हरच्या घरावर 907 किलोचा बॉम्ब टाकला. या हल्ल्यात टॅक्सी ड्रायव्हर, त्याची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर अमेरिकेच्या सेंटकॉमने चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेने इराणच्या नागरी ठिकाणावर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाहीय. युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणच्या मिनाब शाळेवर हल्ला केला होता. त्यात 100 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार केशम बेटावरील हल्ल्यादरम्यान अमेरिकन सैन्याने चह-तंगू भागात बॉम्ब टाकला. 907 किलो वजनाचा हा बॉम्ब होता. हा बॉम्ब फुटल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
अमेरिकन सैन्याने ज्या व्यक्तीच्या घरावर 907 किलोचा बॉम्ब टाकला त्याची ओळख पटली आहे. कैसर जाफरी असं त्याचं नाव आहे. केशम बेट परिसरात तो टॅक्सी चालवायचं काम करायचा. हल्ला झाला त्यादिवशी कैसर संपूर्ण कुटुंबासह आपल्या घरीच होता. अमेरिकेने थेट त्याच्या घरावर बॉम्ब टाकला. या हल्ल्यात कैसरची पत्नी जहरा आणि मुलगी सनाचा मृत्यू झाला. त्याची 2 मुलं वाचली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. कैसरच्या घरावर मार्क 84 बॉम्ब टाकला. हा अमेरिकेचा सर्वात खतरनाक बॉम्ब मानला जातो.
30 फूट खोल खड्डा पडला
हा बॉम्ब घरावर पडताच कैशर जाफरी यांचं घर क्षणात जमीनदोस्त झालं. त्याशिवाय 30 फूट खोल खड्डा पडला. धुराचा एक मोठा लोळ वरती उठताना दिसला. या भागात 100 पेक्षा जास्त घरं आहेत. स्थानिक लोक इथे राहतात. टॅक्सी ड्रायव्हरच्या घरावरील हल्ल्याबद्दल सेंटकॉमचे प्रवक्ते टिम हॉकिन्स अमेरिकी मीडियाशी बोलताना म्हणाले की, ‘आम्हाला या बद्दल माहित आहे. आम्ही चौकशी करतोय. अमेरिकी सैन्य कधीही नागरिकांना टार्गेट करत नाही’. इराणी अधिकाऱ्यांनुसार टॅक्सी ड्रायव्हरच्या घरावरील हल्ल्यानंतर जवळपास 24 कुटुंबांनी या परिसरातून स्थलांतर केलं आहे. भविष्यात इथे हल्ला होण्याची भिती त्यांना सतावत आहे. केशम बेट होर्मुज जवळ आहे. इथूनच इराण तेल आणि गॅसचा पुरवठा करतं. केशमवर हल्ला करुन इराणला सर्वात जास्त जखमी करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे.
