
भारतासह जगातील बहुतांशी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते. मात्र इस्लाममध्ये दारू पिणे हराम आहे, त्यामुळे इस्लामिक देशात दारूवर बंदी आहे. मात्र तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, जगातील सर्वात मोठा बार एका मुस्लीम देशात आहे. 32 हजार स्क्वेअर फुट जागेत असलेला हा मॅककॅफर्टीस जेव्हीसी बार दुबईच्या जुमेराह व्हिलेज सर्कलमध्ये आहे. ही जागा अर्ध्या फुटबॉल मैदानाएवढी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात मोठा बार म्हणून याची नोंद आहे.
मॅककॅफर्टीस जेव्हीसी हा बार आयरिश संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. हा बार दुबईच्या सर्कल मॉलच्या संपूर्ण छतावर पसरलेला आहे. लोक छतावर मद्याचा आनंद घेतात. या बारमध्ये असंख्य आयरिश पब कलाकृती आणि प्राचीन वस्तू आहेत. त्यामुळे या बारचे सौदर्य आणखी वाढते.
या बारमध्ये एक मोठा आउटडोअर टेरेस जिथे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी आयरिश बिअर गिनीजसह एकूण 148 पेक्षा जास्त प्रकारच्या बिअर मिळतात. यातील गिनीज बीअर हा प्रसिद्ध आयरिश बीअर ब्रँड आहे. ही बिअर आयर्लंडमध्ये तयार केली जाते. या बारमध्ये गिनीज ही बिअर थूप लोकप्रिय पसंती आहे. जगभरातील आयर्लंड पब आणि बारमध्ये ती खूप प्रसिद्ध आहे. या बिअरची किंमत 800 रुपयांच्या आसपास आहे.
मॅककॅफर्टीस जेव्हीसी या बारमध्ये एलईडी स्क्रीन, पूल आणि टेबल टेनिस टेबल देखील आहे. हा बार मॅककॅफर्टीजचा युएईमधील पाचवा आणि जगभरातील 18 वा बार आहे. मात्र जेव्हीसी (जुमेराह व्हिलेज सर्कल) ही शाखा खूप खास आहे. या बारमध्ये तुम्ही लाईव्ह गाणी, मनोरंजक खेळ खेळू शकता. या बारमधील वातावरण हे मनाला शांती देणारे असते. त्यामुळे येथे अनेक पर्यटक विरंगुळ्यासाठी येतात.
युएई आणि दुबईमध्ये अल्कोहोलबाबत कडक नियम आहेत. शारजाहमध्ये मद्यावर बंदी आहे. अजमानमध्ये अल्कोहोल मद्य खरेदी करता येते. 2022 मध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पर्यटकांना हॉटेलमध्ये मद्यपान करण्यासाठी किंवा दुकानातून दारू खरेदी करण्यासाठी परवान्याची आवश्यकता नाही. मात्र दारु खरेदी करणाऱ्याचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. पर्यटक फक्त पासपोर्ट दाखवून दारू खरेदी करू शकतात. मात्र ते सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ शकत नाही. ते बारमध्ये किंवा घरी मद्याचे सेवन करू शकतात.