
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या 3 वर्षांपासून सुरु आहे. याबाबत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे एकमेकांची भेट घेणार आहेत. यात प्रादेशिक देवाणघेवाण करुन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अलास्कामध्ये होणाऱ्या या भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेन एक इंचही जमीन देणार नाही अशी भूमिका झेलेन्स्की यांनी घेतली आहे.
झेलेन्स्की यांनी पुढे बोलताना म्हटले की, युक्रेनशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये एखादा करार कसा होऊ शकतो. जर असा काही निर्णय घेतला गेला तर तो शांततेविरुद्धचा एक वाईट निर्णय असेल. कारण युक्रेनविरुद्धचा कोणताही निर्णय शांततेच्या विरोधात आहे. अशा निर्णयांमधून काहीही साध्य होणार नाही. आम्हाला शांततेची आवश्यकता आहे. याचा सर्वांनी आदर करायला हवा.
X वरील एका व्हिडिओ पोस्टमध्ये झेलेन्स्की म्हणाले की, ट्रम्प आणि पुतीन यांनी भेटीची तयारी केली, ही भेट अलास्कामध्ये होत आहे, हे ठिकाणी युद्धभूमीपासून खूप दूर आहे. आमच्या भूमीवर जे युद्ध सुरू आहे ते युक्रेनशिवाय संपू शकत नाही. पुतीन यांना त्यांच्या लोकांवर विश्वास नव्हता, म्हणूनच त्यांनी युक्रेन ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. मात्र ही त्यांची चूक आहे. स्वतःचे रक्षण कसे करायचे हे आम्हाला माहिती आहे.
झेलेन्स्की म्हणाले की, युद्ध सुरु झाल्यालर रशियासोबत असलेल्या देशांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे, कारण त्यांना माहित आहे की पुतीन चुकीच्या गोष्टी करत आहेत. प्रत्येकाने शांततेला महत्व देण्याबाबत भूमिका घेतली पाहिजे. रशियाला हे युद्ध संपवावे लागेल, कारण त्यांनीच ते सुरू केले आहे, आणि तेच ते पुढे ढकलत आहेत.
पुतीन यांची भेट घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी म्हटले होते की, ‘युद्ध संपण्याच्या जवळ आहे. दोन्ही देशांना हा रक्तपात थांबवावा लागेल. यासाठी प्रादेशिक अदलाबदल हा एक चांगला पर्याय आहे.’ मात्र आता ट्रम्प यांच्या या विधानाला झेलेन्स्की यांनी चोख शब्दात उत्तर दिले आहे.