गुप्त धनावर खरंच साप कुंडली मारून बसतो? योगायोग की खास कारण…
Snake Facts Hidden Treasure: साप खरंच गुप्त धनाचे रक्षण करतो का? साप गुप्तधनावर कुंडली मारून बसतो का? ही अंधश्रद्धा आहे की योगायोग? काय आहे सत्य...

Snake Facts Hidden Treasure: मध्यंतरी बॉलिवूडमध्ये नाग-नागिणी या विषयावर चित्रपटाची लाट आली होती. त्यात साप हा एखाद्या गुप्त धनाचे रक्षण करत असल्याचे दाखवण्यात आले. काही मालिका, ग्रामीण भागातील लोककथांमध्ये असाच दावा आहे. जमिनीत गाडलेल्या सोन्याच्या नाण्यांच्या हुंडीवर खरंच साप वेटोळे मारून बसतो का? तो खरोखरच अशा खजिन्याचे रक्षण करतो का? सर्पतज्ज्ञांच्या मते हे एका खुळापलिकडं काहीच नाही. हा तथ्यहिन दावा आहे. ही एक मोठी अंधश्रद्धा आहे. सापांचा आणि गुप्त धनाचा काहीएक संबंध नसतो. पण मग साप जुन्या इमारती आणि वाड्यांमध्ये का आढळतात? असा प्रश्न काहींच्या मनात येतो.
काय आहे कारण?
अनेकदा जुने पडीक वाडे, किल्ले, त्यांच्या तळघरात, अडगळीत साप आढळतात. हे साप मोठे असतात. हे साप पाहताच अनेकांची बोबडी वळते. हे साप तिथल्या संपत्तीचे, धनाचे रक्षण करतात असे सांगितले जाते. अशा पडीक आणि अडगळीच्या जागीच सापांचे भक्ष्य असल्याने साप तिथे आढळतात. उंदीर, घूस आणि इतर लहान प्राणी अशा अडगळीच्या ठिकाणी सहज आढळतात. ते सापांचे मुख्य अन्न आहे. तर हे स्थान सुरक्षित असल्याने तिथे अंडी घालण्यासाठी योग्य तापमानही मिळत असल्याने साप पडीक वाडे, किल्ले, गढ्यांचा आश्रय घेतात. पण त्यातून मग ते गुप्त धनाचे संरक्षण करतात असा समज निर्माण झाला आहे.
गुप्तधनावर कसा आढळतो साप?
अनेक वर्षांपूर्वी लोक त्यांचे सोने-चांदीचे दागिने, नाणी ही जमिनीखाली पुरवून ठेवतं. काळाच्या ओघात ही माणसं युद्धात मारल्या गेली अथवा तो परिसर शत्रूच्या ताब्यात आल्यावर धन हे जमिनीत पुरलेलेच राहते. या जागा अडगळीत असल्याने आणि तिथे भक्ष्य मिळत असल्याने अनेकदा खोदकामात गुप्त धनासोबत साप, सापाची अंडी, पिल्लंही आढळली आहे. त्यावरून असा समज तयार झाला आहे. सापाची दृष्टी अंधूक असते. तो कंपनावरून आणि गंधाच्या साहाय्याने परिसराचा, वस्तू, प्राण्याचा अंदाज घेतो. त्यामुळे सोन्याच्या हंड्यावर, गुप्तधनावर बसून तो त्यांचे रक्षण करतो असे म्हणणे चुकीचे असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
तर अनेकदा भोंदू या लोककल्पनाचा गैरफायदा घेत भोळ्याभाबड्या लोकांना गुप्तधनाचे आमिष दाखवून फसवतात. जुने वाडे, गढी असलेल्या लोकांना गाठून तुमच्या परिसरात गुप्तधन असल्याचा दावा करतात. या भागात खोदकाम आणि साफसफाई करायला घेतल्यावर साप आढळतो. त्याआधारे गुप्तधन असल्याचा दावा करण्यात येतो आणि फसवणूक करण्यात येते.
