
भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेली जीवितहानी अनेकदा तांत्रिक सूचना मिळाल्या असत्या तर टाळता आली असती, असं तज्ज्ञांचं मत असतं. याच दिशेने आता Google एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. Android स्मार्टफोन्समध्ये आधीच उपलब्ध असलेलं भूकंप अलर्ट फीचर आता Google आपल्या Wear OS स्मार्टवॉचमध्ये सुद्धा आणण्याच्या तयारीत आहे.
या नव्या तंत्रज्ञानामुळे यूजर्सना भूकंप येण्याच्या काही सेकंद आधीच चेतावणी मिळू शकते, जे त्यांच्या जीवित सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. सध्या भारतात या फीचरची उपलब्धता कधी होणार, याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण जागतिक पातळीवर या फीचरचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Google चा हा भूकंप अलर्ट सिस्टम अगदी स्मार्ट पद्धतीवर आधारित आहे. पारंपरिक पद्धतीने Seismometer म्हणजेच भूकंपीय सेंसर वापरून भूकंपाचा अंदाज घेतला जातो. पण Google ने यासाठी आपल्या Android स्मार्टफोन्समध्ये असलेल्या मोशन सेन्सर्सचा वापर करून एक नवं मॉडेल तयार केलं आहे. जेव्हा एका भागात अनेक Android युजर्सच्या मोबाईलमध्ये एकाच वेळी कंपन होतो, तेव्हा तो सिग्नल Google च्या सर्व्हरकडे जातो. नंतर तो डेटा प्रोसेस करून जर भूकंपाची खात्री पटली, तर संबंधित युजर्सना अलर्ट पाठवला जातो.
Android Authority च्या अहवालानुसार, आता हाच अलर्ट सिस्टम Wear OS स्मार्टवॉचमध्ये आणण्यात येणार आहे. म्हणजेच, स्मार्टवॉच यूजर्सनाही भूकंपाची रिअल-टाइम नोटिफिकेशन मिळू शकते. हे नोटिफिकेशन नेमकं कसं असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, कंपनीच्या हालचाली पाहता हे अलर्ट लवकरच सार्वजनिक होण्याची शक्यता आहे.
या सिस्टमची खास गोष्ट म्हणजे केवळ अलर्ट देण्यावर मर्यादित न राहता, हे अलर्ट यूजर्सना भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजेच ‘एपिकसेंटर’ची माहिती सुद्धा देईल. मात्र, भूकंप येण्याच्या किती सेकंद आधी हा अलर्ट मिळेल, याबाबत अजून स्पष्टता नाही. तरीही, हे तंत्रज्ञान भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
एकंदरीत पाहता, Google चे हे पाऊल भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी क्रांतिकारी ठरू शकते. स्मार्टवॉचचा वापर आता आरोग्य व फिटनेसपुरता मर्यादित राहणार नसून, आपल्याला वेळेत सूचना देऊन जीवित हानी टाळण्यासही मदत करणार आहे.