एसीच्या अतीवापरावर सरकारचा नवा निर्बंध काय ? जाणून घ्या सविस्तर
एसी वापरणाऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एसीचं तापमान 20°C पेक्षा कमी करता येणार नाही. या नव्या नियमामुळे वीज बचत, आरोग्याची काळजी आणि पर्यावरणाचं रक्षण होणार आहे.त्यामुळे तुमचा एसी वापरण्याचा पद्धतीत काय बदल होणार ? यासाठी नक्की वाचा हा लेख

उन्हाळ्याच्या कडक उन्हात एसीचा वापर हा अनेकांसाठी गरजेचा होतो. तापमान वाढले की अनेकजण सरळ रिमोटवरून तापमान 18-20 डिग्रीपर्यंत खाली आणतात. मात्र आता हे तितकं सोपं राहणार नाही. भारत सरकारने एसीच्या तापमान मर्यादांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार, एसीचे तापमान 20 अंश सेल्सियसपेक्षा कमी करता येणार नाही.
सरकारचा निर्णय काय ?
ऊर्जा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामागे ऊर्जा बचत आणि पर्यावरणाचे रक्षण हे दोन मुख्य उद्देश आहेत. अनेक वेळा लोक एसी खूप कमी तापमानावर चालवतात, ज्यामुळे ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि याचा थेट परिणाम वीजेच्या बिलावर तसेच कार्बन उत्सर्जनावर होतो. सरकारच्या नव्या धोरणानुसार एसीचा वापर अधिक जबाबदारीने व्हावा, यासाठी 20°C ते 28°C या दरम्यानच तापमान ठेवण्यास परवानगी असेल.
निर्णयाचे फायदे
सरकारच्या अहवालानुसार, जर प्रत्येक घरगुती ग्राहक एसीचे तापमान 24-26 डिग्रीवर ठेवले, तर वर्षभरात हजारो युनिट विजेची बचत होऊ शकते. यामुळे प्रत्येक कुटुंबाला वीज बिलात मोठा दिलासा मिळू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त थंड तापमान ठेवल्याने एसीवर अधिक लोड येतो, परिणामी मशीनवर ताण येतो आणि विजेचा वापर वाढतो.
खूप कमी तापमानावर एसी वापरणाऱ्यांना नेहमी गरम कपडे घालावे लागतात किंवा पांघरूण घ्यावे लागते. मात्र आता 20°C पेक्षा कमी तापमान ठेवलं जाणार नसल्याने ही समस्या आपोआप कमी होईल. यासोबत शरीराच्या नैसर्गिक तापमानाशी सुसंगत वातावरण मिळाल्याने आरोग्यदृष्ट्याही फायदे होणार आहेत.
या निर्णयामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जास्त वीज वापर टाळल्यास कोळशावर चालणाऱ्या वीजनिर्मिती केंद्रांवरचा ताण कमी होईल, परिणामी प्रदूषणातही घट होईल. हवामान बदलाच्या दृष्टीने ही एक सकारात्मक पायरी मानली जात आहे.
तुमचा एसी वापरण्याचा पद्धतीत काय बदल होणार?
नव्या नियमांनुसार ग्राहकांना थोडी सवय बदलावी लागेल. आता एसी वापरताना 24-26°C चा समतोल राखल्यास तो आरोग्यासाठीही उत्तम ठरेल आणि खर्चही कमी राहील. याशिवाय, अनेक कंपन्यांनी आपल्या एसीमध्ये आधीपासूनच 24 डिग्री हा डिफॉल्ट तापमान पर्याय देण्यास सुरुवात केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे दीर्घकालीन दृष्टीने नागरिक, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. हा बदल जरी छोटा वाटत असला, तरी याचा सकारात्मक परिणाम देशभरात जाणवेल.