नवीन शूज किंवा पर्समध्ये छोटे पांढरे पॅकेट का ठेवले जाते? जाणून घ्या
जेव्हा तुम्ही बाजारातून बूट, चप्पल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यात एक लहान पांढरे पॅकेट दिसले असेल. त्यावर स्पष्टपणे लिहिलेले असते की ते खाण्यास मनाई आहे. तर ते लहान पॅकेट त्यात का ठेवले जाते. त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात.

आजच्या डिजिटलच्या युगात लोकं खूप खरेदी करतात. काही लोकांना ऑनलाइन खरेदी करण्याची सवय असते तर काहींना मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याची सवय आहे. अशातच तुम्ही जेव्हा नवीन शूज, पर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्ही पाहिले असेलच की बुटांच्या बॉक्स, ट्रॉली बॅग, टीव्ही बबल रॅप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बॉक्समध्ये लहान पांढरे पॅकेट ठेवलेले असतात. त्यावर स्पष्टपणे लिहिलेले असते की हे खाण्यास मनाई आहे.
मात्र बऱ्याचदा लोकं ते काही खाद्यपदार्थ मानतात. जेव्हा तुम्ही बाहेरून त्यांना स्पर्श करता तेव्हा तुम्हाला तांदूळाच्या दाण्यासारखे काहीतरी वाटते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे अन्नपदार्थ नाहीत तर सिलिका जेलचे पॅकेट आहेत. हे सिलिका जेल हवेतील ओलावा शोषून घेण्याचे काम करते . म्हणूनच ते बॅग, शूज किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बॉक्समध्ये ठेवले जातात. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ते सिलिका जेलचे पॅकेट नवीन उत्पादनांमध्ये का ठेवले जातात? चला तर मग जाणून घेऊयात…
सिलिका जेलचे काम
या सिलिका जेल पॅकेटमध्ये 40 टक्क्यांहून अधिक आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामध्ये असलेले सिलिकॉन डायऑक्साइड नावाचे संयुग सहजपणे आर्द्रता आकर्षित करते. सहसा तुम्ही फक्त बुटांच्या बॉक्समध्ये सिलिका जेल पॅकेट पाहिले असतील.
वस्तूंच्या बॉक्समध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो
खरंतर, शूज म्हणा किंवा इतर कोणती नवीन वस्तू बनवण्यापासून ते ठेवण्यापर्यंत आणि विकण्यापर्यंत बॉक्समध्ये ठेवले जातात. जास्त दिवस ती वस्तू बॉक्समध्ये ठेवल्याने त्याला दुर्गंध येण्याची शक्यता असते. अशातच शूजच्या बॉक्समधील शूज खराब देखील होऊ शकतात. ओलाव्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया देखील वाढू शकतात. शूज खराब झाल्यावर व्यवसायिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.
नावीन्य टिकवून ठेवते
नवीन वस्तूचे नावीन्य टिकवून ठेवण्यासाठी सिलिका जेल उपयुक्त ठरू शकते. कारण हे जेलचे पॅकेट ओलावा शोषून घेते आणि शूज दीर्घकाळ नवीन ठेवता येते. सिलिका जेल केवळ शूजसाठीच वापरले जात नाही तर बॅग आणि पर्समध्ये देखील वापरले जाते. तुम्ही तुमच्या घरात शूज आणि चप्पल ठेवता तिथे सिलिका जेलचे पॅकेट देखील ठेवू शकता. यामुळे घरात शूजचा वास येणार नाही .
फेकण्याची चूक करू नका
बरेच लोकं सिलिका जेलच्या पॅकेटवर ‘खाऊ नका’ असे लिहिलेले वाचताच ते फेकून देतात. जर कोणी चुकून ते खाल्ले तर ते त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र तुम्ही जर ते काळजीपूर्वक वापरले तर ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
हे आहेत सिलिका जेलचे फायदे
तुम्ही सिलिका जेल पॅकेट फाईल्स आणि कागदपत्रांमध्ये देखील ठेवू शकता. यामुळे कागदपत्रे खराब होणार नाहीत.
तुम्ही सिलिका जेल इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबत देखील ठेवू शकता. यामुळे त्यांना गंजण्यापासून संरक्षण मिळेल.
यासोबतच सिलिका जेल तुम्हीते सुक्या मेव्यात, मसाल्यांच्या किंवा डाळ आणि तांदळाच्या बॉक्समध्ये देखील ठेवू शकता. यामुळे त्यांचे ताजेपणा टिकून राहील.
जर तुम्ही तुमच्या हिवाळ्यातील कपड्यांमध्ये सिलिका जेलचे पॅकेट ठेवले तर त्यांना कुबट वास येणार नाही.
याशिवाय तुम्ही हे सिलिका जेलचे पॅकेट तुमच्या दागिन्यांमध्ये देखील ठेवू शकता. यामुळे ते नवीन राहतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)