हवेतल्या दुर्घटनांमध्ये महत्त्वाचे ठरणारे हे ब्लॅक बॉक्स आणि DVR कशाचे बनलेले असतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

हवेतल्या दुर्घटनांमध्ये ब्लॅक बॉक्स आणि DVR कशी भूमिका बजावतात, आणि इतक्या भीषण अपघातानंतरही हे डिव्हाइस सुरक्षित कसे राहतात? या लेखाद्वारे जाणून घ्या संपूर्ण माहिती

हवेतल्या दुर्घटनांमध्ये महत्त्वाचे ठरणारे हे ब्लॅक बॉक्स आणि DVR कशाचे बनलेले असतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती
ब्लॅक बॉक्स आणि DVR
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 16, 2025 | 1:59 PM

अहमदाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. भारत सरकारने यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, यामध्ये ब्रिटन आणि अमेरिकेतील तज्ज्ञ संस्थांनी देखील मदतीचा हात दिला आहे. विमान दुर्घटनांमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’ आणि ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)’ हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. यांच्यामधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधता येते आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करता येतात.

ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?

ब्लॅक बॉक्स हे नाव जरी असलं, तरी प्रत्यक्षात याचा रंग केशरी असतो. केशरी रंगामुळे दुर्घटनांनंतर शोध rescue operation दरम्यान त्याला पटकन शोधता येते. ब्लॅक बॉक्समध्ये दोन मुख्य भाग असतात

1. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) : विमानातील तांत्रिक माहिती जसे की उड्डाणाची गती, उंची, इंजिनची स्थिती इत्यादी माहिती नोंदवतो.

2. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) : वैमानिक आणि कंट्रोल टॉवर यांच्यातील संभाषण नोंदवतो.

कशाचे बनवले जातात ब्लॅक बॉक्स आणि DVR?

ब्लॅक बॉक्स आणि DVR हे अत्यंत मजबूत धातूंपासून तयार केले जातात. यामध्ये मुख्यत्वे स्टील किंवा टायटॅनियमचा वापर केला जातो. हे साहित्य इतके मजबूत असते की ते आग, पाणी, अतिप्रचंड दाब आणि अत्यल्प तापमान यांचा सामना करू शकतात. त्यामुळे दुर्घटनेनंतरही या यंत्रणेत सुरक्षितरीत्या माहिती उपलब्ध राहते.

ब्लॅक बॉक्सची रचना कशी असते?

ब्लॅक बॉक्समध्ये सॉलिड स्टेट मेमरीचा वापर केला जातो जो डेटाला सुरक्षित ठेवतो. तसेच त्यात अंडरवॉटर लोकेटिंग बीकन (ULB) असतो, जो पाण्यात बुडाल्यावरही सिग्नल पाठवतो. हा बीकन तब्बल 30 दिवसांपर्यंत सतत सिग्नल देतो, ज्यामुळे बचाव पथकाला ते शोधणे सोपे होते.

ब्लॅक बॉक्स कुठे ठेवला जातो?

विमानाच्या शेवटच्या भागात ब्लॅक बॉक्स ठेवला जातो. यामागील कारण म्हणजे अपघात घडल्यास शेवटच्या भागावर तुलनेत कमी परिणाम होतो आणि ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो.

ब्लॅक बॉक्समधील माहितीचे महत्त्व

दुर्घटनांनंतर ब्लॅक बॉक्समधून मिळणारी माहिती ही अपघाताची खरी कारणे उलगडण्यास मदत करते. यामुळे भविष्यातील उड्डाण सुरक्षेमध्ये सुधारणा करता येते.