
आजचा युग हा डिजिटल युग आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मुलांच्या जीवनावर होत आहे. ऑनलाइन क्लासेस, मनोरंजन, सोशल नेटवर्किंग साईट आणि गेमिंगमुळे मुलांचे जग स्क्रीनपुरते मर्यादित झाले आहे. अशा परिस्थितीत मुले इंटरनेटवर काय पाहत आहेत, विशेषतः लहान मुलं यावर लक्ष ठेवणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे.
मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवल्याने त्यांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवता येते आणि चांगल्या प्रकारे मुलांना इंटनेटचा वापर कसा करावा हे सांगता येते. मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे हे हेरगिरी नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मार्गदर्शनासाठी ते महत्त्वाचे आहे. मुलांच्या डिजिटल ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवता येईल अशा काही टिप्स आज आपण जाणून घेऊयात.
पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे तुमच्या मुलाशी मोकळेपणाने बोलणे. त्यांना समजावून सांगा की इंटरनेटचे फायदे आणि तोटे दोन्ही काय आहेत. ते ऑनलाइन काय करतात, कोणत्या प्रकारचे गेम खेळतात आणि कोणते अॅप्स वापरतात ते त्यांना विचारा. त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करा जेणेकरून कोणत्याही समस्येच्या बाबतीत ते तुमच्याशी थेट बोलू शकतील.
आजकाल अनेक पेरेंटल कंट्रोल ॲप्स आणि सॉफ्टवेअर विकसित केले गेले आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. या ॲप्सच्या मदतीने तुम्ही स्क्रीन टाइम मर्यादा सेट करू शकता. तसेच याच्या मदतीने धोकादायक वेबसाइट ब्लॉक करू शकता, तसेच मुलं कोणते अॅप्स वापरत आहेत यावर लक्ष ठेवू शकता.
मुलांच्या खोलीत जाऊन लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोन वापरण्याऐवजी घरातील जास्त वावर असलेल्या ठिकाणी जसे की हॉलमध्ये किंवा डाइनिंग टेबलवर फोनचा वापर करा. यामुळे मुलांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे सोपे होते आणि ते अनुचित गोष्टी पाहणे देखील टाळतात.
जर तुम्हाला स्वतःला सोशल मीडिया किंवा ऑनलाइन गेमबद्दल माहिती नसेल, तर तुमच्या मुलाच्या ॲक्टिव्हिटी समजून घेणे तुमच्यासाठी कठीण होईल. मूलभूत डिजिटल साक्षरता शिका . तसेच, मुलांना ऑनलाइन गोपनीयता, सायबरबुलिंग आणि हॅकिंग सारख्या धोक्यांबद्दल जागरूक करा. त्यांना पासवर्डचे महत्त्व समजावून सांगा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलू नका हे देखील सांगा.
जर तुमचे मूल सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असेल तर त्यांना तुमचे मित्र किंवा फॉलोअर बनण्यास सांगा. पण मुलांच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट देऊ नका किंवा त्यांना पब्लिकली कमेंट करू नका याची खात्री पालकांनी ठेवली पाहिजे. यांचा उद्देश फक्त मुलांच्या सोशल मीडियावरील गोष्टींवर लक्ष ठेवणे आहे.
घरी डिजिटल उपकरणांच्या वापरासाठी स्पष्ट नियम बनवा. जेवताना फोन नको, शाळेचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत स्क्रीन टाइम नको, रात्रीच्या वेळी ठराविक वेळेनंतर सर्व मोबाईल व इतर उपकरणं खोलीत ठेवावीत.