King Cobra Secret: किंग कोब्राचं मोठं सीक्रेट पहिल्यांदाच समोर… 188 वर्ष जुनी मान्यता मोडीत; 12 वर्षाच्या संसोधनात काय आढळलं?
King Cobra Facts: भारतीय शास्त्रज्ञांनी एक मोठा शोध लावला आहे. बारा वर्षांच्या संशोधनानंतर असे आढळून आले आहे की किंग कोब्रा हा केवळ एक नसून चार वेगवेगळ्या प्रजातींचा समूह आहे. या संशोधनामुळे जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या किंग कोब्रा बद्दलच्या 188 वर्षांच्या जुन्या समजुतीला धक्का बसला आहे.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या जगातील सर्वात विषारी साप म्हणजे किंग कोब्रा. परंतु तुम्हाला माहिती आहे का किंग कोब्रा या सापाची आता फक्त एक प्रजाती राहिलेली नाही. शास्त्रज्ञांनांकडून किंग कोब्राच्या एकुण चार प्रजातींचा शोध लावण्यात आलेला आहे. या संशोधनानुसार, किंग कोब्राचे संपूर्ण जगभरात चार प्रजाती पाहायला मिळतात. या चार प्रजाती प्रामुख्याने आशिया, सागरी आग्नेय आशिया, भारताच्या पश्चिम घाट आणि फिलीपिन्समधील लुझोन या उत्तरेकडील बेटावर आढळतात.
गेल्या दोन दशकांपासून किंग कोब्रावर संशोधन करणाऱ्या डॉ. पी. गौरी शंकर यांच्या टीमने हा नवीन शोध लावला आहे. कर्नाटकमधील अगुंबे येथील कलिंगा सेंटर फॉर रेनफॉरेस्ट इकोलॉजी येथील शास्त्रज्ञांनी 12 वर्षांच्या संशोधनानंतर हा आवाहाल जाहिर केला आहे की, ‘किंग कोब्रा ही एक नाही तर चार वेगवेगळ्या प्रजाती आहेत’. हे संशोधन 2012 ते 2024 पर्यंत चालले, ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात मोठ्या विषारी सापाची शरीररचना आणि जनुकांचा सखोल अभ्यास केला आहे.
किंग कोबऱ्याच्या चार प्रजाती कोणत्या?
शास्त्रज्ञांकडून केलेल्या संशोधनामध्ये किंग कोब्राच्या चार प्रजाती आढळून आल्या आहेत. या चारही प्रजाती वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. यामधील पहिली प्रजाती ”ओफिओफॅगस कलिंग’ जी नैऋत्य भारतातील पश्चिम घाटात आढळते. या प्रजातीच्या कोब्राच्या शरीरावर 40 पेक्षा कमी पट्टे पाहायला मिळतात. यामधील दुसरी प्रजाती म्हणजे ‘ओफिओफॅगस हन्ना’ ही प्रजाती प्रजाती उत्तर आणि पूर्व भारत, अंदमान बेटे, पूर्व पाकिस्तान, इंडो-बर्मा, इंडो-चीन आणि थायलंडमध्ये आढळते. या सापाच्या शरीरावर 50 ते 70 पट्टे असतात. किंग कोब्राच्या तिसऱ्या प्रजातीचे नाव ‘ओफिओफॅगस बंगरस’ आहे, जे मलय प्रायद्वीप, ग्रेटर सुंडा द्वीप आणि दक्षिण फिलीपिन्सच्या काही भागात आढळते. त्याच्या शरीरावर 70 हून अधिक पट्टे आहेत. चौथी प्रजाती ‘ओफिओफॅगस साल्वाटाना’ आहे आणि ती उत्तर फिलीपिन्समधील लुझोनमध्ये आढळते. त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे पट्टे नाहीत.




संशोधन पथकाचे प्रमुख डॉ. पी. गौरी शंकर म्हणाले की, किंग कोब्राच्या एकापेक्षा जास्त प्रजाती असू शकतात असा अनेकांचा अंदाज होता, परंतु आजपर्यंत कोणीही ते सिद्ध करू शकलेले नाही. संशोधन पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून किंग कोब्राचे ऊतींचे नमुने गोळा केले आणि त्यांचे फोटो काढले. या संशेधकांच्या टीमने रंग, पट्टे, खवले आणि शरीराचे प्रमाण अशा अनेक पैलूंवर सखोल संशोधन आणि अभ्यास केले. किंग कोब्र्याबद्दल संशोधन भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि पश्चिम घाटापासून आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशांपर्यंत तसेच इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये करण्यात आले. संशोधनानंतर, शास्त्रज्ञांनी पुष्टी केली आहे की किंग कोब्रा हा एकाच प्रजातीचा समूह नाही, तर तो अनेक वेगवेगळ्या प्रजातींचे मिश्रण आहे. 188 वर्षांपूर्वी, 1836 मध्ये, डॅनिश प्राणीशास्त्रज्ञ थियोडोर एडवर्ड कॅन्टर यांनी किंग कोब्राची प्रजाती म्हणून ओळख पटवली होती.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की किंग कोब्राच्या प्रत्येक प्रजातीसाठी स्वतंत्र संवर्धन योजना बनवण्याची गरज आहे, कारण प्रत्येक प्रजातीच्या स्वतःच्या वेगवेगळ्या गरजा असतात. IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) च्या रेड लिस्टमध्ये किंग कोब्रा ‘असुरक्षित’ म्हणून पाहायला जातो. याशिवाय, CITES (संकटग्रस्त प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापार करार) च्या यादीत देखील त्याचा समावेश करण्यात आला आहे. किंग कोब्र्याची तस्करी आणि शिकारींमुळे या सापाच्या अस्तित्वाला मोठा धोका आहे.