पेढे, बर्फी किंवा फळेही नाहीत, तर या मंदिरात देवीला चक्क पिझ्झा, सँडविच अन् पाणीपुरी अर्पण केली जाते.
भारतातील काही मंदिरात पारंपरिक मिठाईऐवजी देवीला पिझ्झा, सँडविच आणि बर्गरचा नैवेद्य अर्पण केला जातो. ही अनोखी परंपरा पर्यटकांना आजही आश्चर्यचकित करते. पण नक्की अशी परंपरा का आहे ? तसेच त्यामागे नक्की काय कारण आहे? जाणून घेऊयात.

जेव्हा कधी मंदिरात जातो तेव्हा देवी-देवतांना अर्पण करण्यासाठी फूल, हार, फळ किंवा मिठाई घेऊन जातो. ते नैवद्य म्हणून अर्पण करतो. अनेक मंदिरांची तर त्यांचा प्रसाद हीच खासीयत आणि ओळख असते. काही ठराविक देवी-देवतांच्यां मंदिरात त्याच विशिष्ट प्रकारचा, खास असा प्रसाद मिळतो हे भाविकांना माहित असते. पूजेदरम्यान प्रसाद किंवा भोग देण्याची परंपरा देखील महत्त्वाची आहे. पूजेदरम्यान देवतांना भोग देण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे अनेकजण मंदिरात जाताना शक्यतो लाडू, बताशा, पेढे, सुकामेवा, फळे आणि इतर नैवेद्य अर्पण करण्यासाठी घेऊन जातात. पण असं एक मंदिर आहे जिथे देवीला नैवेद्य म्हणून खीर-पुरी, हलवा किंवा लाडू-पेढा अर्पण करत नाही तर, पिझ्झा, सँडविच, बर्गर, पाणी-पुरी आणि थंड पेये अर्पण केली जातात.
मंदिरात बर्गर, सँडविच आणि पिझ्झा सारखे नैवद्य अर्पण केले जातात
होय, हे तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, पण भक्तांना ते देवीची एक अनोखी लीला वाटते. भारतात असं एकच नाही तर अनेक मंदिरे आहेत जिथे अनोख्या प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. राजकोटमधील रापुताना येथील जीविका माताजी मंदिर आणि तमिळनाडूतील चेन्नईतील पडप्पाई येथील जय दुर्गा पीठम मंदिरात रोज लाखोने भाविक येत असतात. ही दोन्ही मंदिरे भक्तांच्या श्रद्धेची केंद्रे मानली जातात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे बर्गर, सँडविच आणि पिझ्झा सारखा नैवद्य अर्पण केला जातो.
हे प्रसाद मुलांसाठी बनवले जातात
रापुताना येथील जीविका माताजी मंदिर अंदाजे 65-70 वर्षे जुने आहे. भाविक येथे त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी येतात. मंदिराच्या पुजारांनी स्पष्ट केलं आहे की पूर्वी मंदिरात फक्त नारळ आणि साखर प्रसाद अर्पण केला जात असे. तथापि, मुलांना आकर्षित करण्यासाठी, आता हे स्वादिष्ट पदार्थ देखील अर्पण केले जातात. शिवाय, मंदिरातील देणग्या सामाजिक कार्यासाठी वापरल्या जातात. म्हणूनच लोक स्वेच्छेने दान करतात आणि मुलांसाठी बर्गर, सँडविच आणि पिझ्झा सारखे पदार्थ अर्पण केले जातात.
मंदिरात प्रसादासाठी हे पदार्थ का ठेवले जातात?
चेन्नईतील पडप्पाई येथील जय दुर्गा पीठम मंदिरातही भक्त पिझ्झा, बर्गर आणि सँडविच अर्पण करतात. या मंदिराची स्थापना हर्बल ऑन्कोलॉजिस्ट के. श्री श्रीधर यांनी केली होती. मंदिरातील प्रसादाचा हा मेन्यू दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करतात. भक्त त्यांच्या जन्मतारखेची नोंदणी देखील करू शकतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना प्रसाद म्हणून केक दिला जातो. तथापि, सर्व प्रसाद पूर्ण शुद्धतेने आणि पवित्र स्वयंपाकघरात तयार केला जातो आणि देवाला अर्पण केला जातो. शिवाय, मंदिरात दिले जाणारे प्रसाद FSSAI प्रमाणित आहेत.
