भारतातील असा शेतकरी, ज्याच्याकडे होती स्वतःची ट्रेन; रेल्वेकडूनच वसूल करत होता भाडं!

रेल्वेने तर अनेकजण दररोज प्रवास करतात, पण तुम्ही कधी ऐकलं आहे का एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर संपूर्ण ट्रेन असेल? जाणून घ्या सविस्तर

भारतातील असा शेतकरी, ज्याच्याकडे होती स्वतःची ट्रेन; रेल्वेकडूनच वसूल करत होता भाडं!
| Updated on: May 05, 2026 | 4:49 PM

भारतात रेल्वेने प्रवास करणे हे सर्वसामान्यांसाठी रोजचेच झाले आहे. मात्र एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर संपूर्ण ट्रेन असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? ही गोष्ट ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असली तरी अशीच एक धक्कादायक आणि रोचक घटना पंजाबमध्ये घडली होती.

ही कथा आहे पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील कटाणा गावात राहणाऱ्या संपूर्ण सिंग यांची. 2007 साली भारतीय रेल्वेने लुधियाना ते चंदीगड दरम्यान नवीन रेल्वेमार्ग टाकण्याचे काम सुरू केले. यासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली.

या प्रकल्पात संपूर्ण सिंग यांचीही जमीन आली. त्यावेळी रेल्वेकडून त्यांना सुमारे 25 लाख रुपये प्रति एकर असा मोबदला देण्यात आला. सुरुवातीला त्यांनी हा व्यवहार मान्य केला. मात्र काही काळानंतर त्यांना समजले की, जवळच्या गावात त्याच प्रकारच्या जमिनीसाठी 71 लाख रुपये प्रति एकर मोबदला देण्यात आला होता.

या तफावतीमुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याने संपूर्ण सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने मोबदला वाढवून प्रथम 50 लाख रुपये प्रति एकर केला आणि नंतर एकूण भरपाई 1.47 कोटी रुपये निश्चित केली. न्यायालयाने 2015 पर्यंत संपूर्ण रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र भारतीय रेल्वेकडून केवळ 42 लाख रुपयेच देण्यात आले तर उर्वरित 1.05 कोटी रुपये प्रलंबित राहिले.

‘स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस’ झाली कुर्क

प्रकरण अधिक गंभीर झाल्यानंतर 2017 साली जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी मोठा निर्णय घेतला. न्यायाधीशांनी लुधियाना स्थानकावर उभी असलेली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस कुर्क करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर संपूर्ण सिंग थेट स्टेशनवर पोहोचले आणि कागदोपत्री काही काळासाठी त्या ट्रेनवर त्यांचा ताबा आला. या घटनेमुळे ते ट्रेनचे मालक ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली.

मात्र, ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. भारतीय रेल्वे प्रशासनाने तात्काळ हालचाल करत न्यायालयाच्या मदतीने काही मिनिटांतच ट्रेन पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. काही अहवालांनुसार, या प्रकरणातील आर्थिक वाद अद्याप पूर्णपणे निकाली निघालेला नाही आणि तो न्यायालयात प्रलंबित आहे.

एक सामान्य शेतकरी आपल्या हक्कासाठी न्यायालयात लढतो आणि काही काळासाठी का होईना पण संपूर्ण ट्रेनवर हक्क मिळवतो. ही घटना एखाद्या चित्रपटातील कथेसारखीच वाटते. संपूर्ण सिंग यांची ही कहाणी न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी ठरते.

Follow Us