प्राण्यांमधला ‘कुंभकर्ण’ म्हणावा असा हा प्राणी नेमका कोण? जाणून घ्या सविस्तर!

माणसाला ८ तास झोप पुरेशी असते, पण एक असा गोंडस प्राणी आहे जो दिवसाचे १८-२२ तास झोपतो! इतकी झोप घेणाऱ्या या प्राण्यामुळे 'कुंभकर्ण'ची आठवण होते. पण हा प्राणी कोण आहे आणि तो इतका झोपाळू का आहे, जाणून घ्या

प्राण्यांमधला कुंभकर्ण म्हणावा असा हा प्राणी नेमका कोण? जाणून घ्या सविस्तर!
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 12:26 PM

चांगल्या आरोग्यासाठी माणसाला किमान ६ ते ८ तास झोप घेणं गरजेचं आहे, असं डॉक्टर सांगतात. झोप पूर्ण झाली नाही, तर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पण जगात असाही एक प्राणी आहे, जो आपल्या आयुष्याचा बहुतेक वेळ फक्त झोपण्यातच घालवतो! त्याला बघितल्यावर आपल्याला कुंभकर्णाचीच आठवण येईल.

कोणता आहे हा ‘झोपाळू’ प्राणी?

हा प्राणी आहे कोआला. हा एक शाकाहारी आणि अत्यंत गोंडस दिसणारा प्राणी आहे, जो प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्येच आढळतो. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात असलेल्या निलगिरीच्या जंगलांमध्ये कोआलाचं वास्तव्य असतं. तो झाडांवरच राहतो आणि निलगिरीची पानं हेच त्याचं मुख्य अन्न आहे. एक कोआला दिवसाला जवळपास एक किलोग्रॅम निलगिरीची पानं खातो!

कोल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य

एक रंजक गोष्ट म्हणजे, कोआलाला ‘No Drink’ म्हणजे ‘पाणी न पिणारा’ प्राणी म्हणूनही ओळखलं जातं. कारण तो दिवसातून अगदी नगण्य किंवा जवळपास पाणी पीतच नाही. त्याच्या शरीराला लागणाऱ्या पाण्याची गरज ही तो खात असलेल्या निलगिरीच्या पानांमधूनच पूर्ण होते.

आता येऊया त्याच्या झोपेच्या वेळेवर. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण कोआला दिवसाचे १८ ते २२ तास झोपून असतो! होय, हे खरं आहे. म्हणूनच त्याला जगातील सर्वात जास्त झोपणाऱ्या प्राण्यांपैकी एक आणि सर्वात आळशी प्राण्यांपैकी एक मानलं जातं.

इतकी झोप का गरजेची?

कोआला इतका वेळ का झोपतो, यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. निलगिरीच्या पानांमध्ये पोषक तत्वं खूप कमी असतात आणि ती पचायला खूप ऊर्जा लागते. या पानांमधून मिळणारी कमी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि पचनक्रियेला पुरेसा वेळ देण्यासाठी कोआलाला इतकी जास्त झोप घेणं गरजेचं असतं. तो एकटा राहणारा प्राणी आहे आणि दिवसाचा बहुतेक वेळ खाण्यात किंवा झोपण्यातच घालवतो.

कोआला हा ‘Marsupial’ गटातील प्राणी आहे. याचा अर्थ, त्याची पिल्लं जन्माच्या वेळी पूर्णपणे विकसित झालेली नसतात. कोआलाच्या पिल्लाला ‘Joey’ म्हणतात. जन्मानंतर हे पिल्लू साधारणपणे सहा ते सात महिने आपल्या आईच्या पोटावरील पिशवीत राहतं आणि तिथेच वाढतं. त्यानंतर ते आईच्या पाठीवर बसून जवळपास एक वर्षापर्यंत फिरतं.

नर कोआलाचं सरासरी आयुष्य १२ वर्ष आणि मादी कोआलाचं १५ वर्षांपर्यंत असतं.