नौदलाची जहाजे राखाडी रंगाचीच का असतात? जाणून घ्या यामागचे कारण
जगभरातील नौदल हे त्यांच्या जहाजांसाठी एक ठरलेला रंगच वापरतात, पण यामागे कारण काय आहे? नौदलाची जहाजे राखाडी रंगाचीच का असतात? चला या लेखातून जाणून घेऊया...

नौदल हे कोणत्याही देशाच्या सागरी सुरक्षेचा बळकट किल्ला मानलं जातं. समुद्रावर वर्चस्व राखण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नौदलाच्या जहाजांना फार महत्त्व आहे. ही जहाजं केवळ सामर्थ्यवानच नसून, त्यांचा रंगसुद्धा त्याचं एक महत्त्वाचं अंग आहे. बहुतेक वेळा आपण पाहतो की नौदलाची जहाजं राखाडी रंगाची असतात. पण यामागचं कारण काय असावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचा उत्तर वैज्ञानिक, रणनीतिक आणि प्रात्यक्षिक दृष्टिकोनातून अतिशय रंजक आहे.
राखाडी रंगाची निवड ही फक्त रंगसौंदर्यासाठी नव्हे, तर विशिष्ट रणनीतीमुळे करण्यात आलेली आहे. समुद्र आणि आकाश यांच्यातील नैसर्गिक छटा प्रामुख्याने निळसर, पांढरट आणि राखाडी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे जेव्हा जहाज राखाडी रंगाचं असतं, तेव्हा ते या पार्श्वभूमीत मिसळून जातं. विशेषतः ढगाळ वातावरण, समुद्रातील धुके किंवा सूर्यप्रकाशाच्या प्रतिबिंबात, हे जहाज सहजपणे ओळखता येत नाही. अशा वेळी शत्रूंसाठी या जहाजांना लांबून लक्ष्य करणं अवघड होऊन जातं.
राखाडी रंगाचा आणखी एक फायदा म्हणजे तो सूर्यप्रकाश कमी प्रमाणात परावर्तित करतो. त्यामुळे जहाजावरून प्रकाशाची चमक दूरवर जात नाही आणि जहाज लपून राहण्यात यशस्वी ठरतं. युद्धाच्या परिस्थितीत शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी ही खूपच महत्त्वाची गोष्ट ठरते.
तसेच, राखाडी रंगावर धूळ, गंज किंवा मीठाचे डाग इत्यादी सहजपणे दिसत नाहीत. समुद्रात सातत्याने राहणाऱ्या जहाजांसाठी ही बाब खूप फायदेशीर ठरते. कारण यामुळे देखभाल कमी लागते आणि जहाजाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. शिवाय, हा रंग जास्त उष्णता शोषत नाही, त्यामुळे जहाजाच्या आतील तापमान तुलनेत नियंत्रित राहतं. यामुळेच जागतिक पातळीवर बहुतेक नौदल राखाडी रंगाचा स्वीकार करतात.
पाणबुड्यांच्या बाबतीत मात्र रंगसंगतीत थोडी वेगळी रणनीती दिसून येते. बहुतेक देशांमध्ये पाणबुड्या काळ्या रंगात रंगवल्या जातात. काळा रंग खोल समुद्रात उठून दिसत नाही आणि तो अंधारात सहज लपतो. मात्र काही देश जसे की उत्तर कोरिया, इराण आणि इस्रायल यांनी पाणबुड्यांना हिरव्या रंगाने रंगवण्याची पद्धत स्वीकारली आहे. हिरवा रंग खवखवत्या पाण्याच्या किंवा समुद्रातील वनस्पतींसोबत मिसळतो, त्यामुळे शत्रूच्या नजरेपासून पाणबुड्या सहजपणे लपवता येतात.
