खास लोकांच्या स्वागतासाठी फक्त ‘रेड कार्पेट’च का? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

तुम्ही कधी विचार केला आहे का की खास व्यक्तींच्या स्वागतासाठी निळा किंवा पिवळा नव्हे, तर फक्त रेड कार्पेटच का वापरला जातो? या परंपरेमागचे रहस्य आज आपण जाणून घेऊया.

खास लोकांच्या स्वागतासाठी फक्त रेड कार्पेटच का? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास
Red Carpet
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Aug 21, 2025 | 1:27 AM

आपण अनेकदा पाहतो की जेव्हा एखादा मोठा नेता, सेलिब्रेटी किंवा पाहुणा येतो, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरला जातो. लग्नसोहळ्यापासून ते आंतरराष्ट्रीय परिषदांपर्यंत, रेड कार्पेट ही एक खास परंपरा बनली आहे. पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का, की हा कार्पेट फक्त लालच का असतो? या परंपरेमागे एक मोठा आणि रंजक इतिहास दडलेला आहे, जो प्राचीन काळापासून सुरू होतो.

रेड कार्पेटचा ईतीहास

रेड कार्पेटची सुरुवात खूप जुनी आहे. ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये त्याचा वापर दिसून येतो. इसवी सन पूर्व 458 मध्ये लिहिलेल्या एका ग्रीक नाटकात ‘अगमेम्नॉन’ नावाच्या राजाचे स्वागत रेड कार्पेटवर करण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्या काळात लाल रंग खूप मौल्यवान मानला जात असे, कारण नैसर्गिक लाल रंग मिळवणे खूप कठीण आणि महाग होते. त्यामुळे रेड कार्पेट फक्त राजा-महाराजा किंवा खूप श्रीमंत लोकांसाठीच उपलब्ध होता. तो त्यांच्या धन, शक्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक होता.

आधुनिक युगात रेड कार्पेट

ही परंपरा ग्रीसमधून जगभरात पोहोचली. अमेरिकेमध्ये 1821 साली राष्ट्रपती जेम्स मॉरोय यांच्या स्वागतासाठी पहिल्यांदा रेड कार्पेट अंथरण्यात आला. यामुळेच, सरकारी आणि राजनैतिक कार्यक्रमांमध्ये रेड कार्पेट वापरण्याची पद्धत सुरू झाली. विसाव्या शतकात, हॉलीवूडने या परंपरेला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. ऑस्करसारख्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये रेड कार्पेट वापरला जाऊ लागला आणि तो जगभरात प्रसिद्धी, ग्लॅमर आणि सन्मानाचे प्रतीक बनला.

भारतातील वापर

भारतामध्येही रेड कार्पेटचा वापर जुना आहे. असे मानले जाते की, 1911 साली दिल्ली दरबारात तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंगे यांनी किंग जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरला होता. हा दरबार लाल किल्ल्यामध्ये भरवण्यात आला होता. आज, जगभरातील नेत्यांच्या आणि विशेष पाहुण्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट वापरणे ही एक आंतरराष्ट्रीय परंपरा बनली आहे, जी पाहुण्यांबद्दलचा आदर आणि मैत्री दर्शवते.

थोडक्यात, रेड कार्पेट केवळ एक रंग नाही, तर तो हजारो वर्षांच्या इतिहासाची आणि परंपरेची साक्ष आहे. लाल रंगाची दुर्मिळता, किंमत आणि त्याचे सामर्थ्याशी असलेले नाते यामुळेच रेड कार्पेट सन्मान आणि विशेष वागणुकीचे प्रतीक बनला. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या विशेष व्यक्तीला रेड कार्पेटवर पाहू तेव्हा तुम्हाला या परंपरेमागचा मोठा इतिहास आठवेल.