तुमची पत्नी कमी करु शकते EMI चा बोजा, करही वाचणार, कसे? जाणून घ्या
तुम्ही जर नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला देखील होम लोनमध्ये फायदा करुन घ्यायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. यामुळे तुमचा इएमआय तर कमी होईलच पण तुम्हाला करमध्ये अधिक सवलत देखील मिळू शकते. कशी ते जाणून घ्या.

तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण यामुळे तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करताना तुमच्या पत्नीचा जर त्यात समावेश केला तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा होऊ शकतो. तुमच्या पत्नीसोबत जर तर जॉईंट कर्ज घेतले तर तुम्हाला व्याजदरातही सवलत मिळते. याचा तुमच्या EMI वर मोठा परिणाम होतो. याशिवाय तुम्ही आयकरातही मोठी रक्कम वाचवू शकता. चला जाणून घेऊयात यामुळे काय फायदा होऊ शकतो.
स्वस्त गृह कर्ज
तुम्ही जर महिला सह-अर्जदार (आई, पत्नी किंवा बहीण) सोबत संयुक्त गृहकर्ज घेतले तर तुम्हाला व्याजदरात सवलत मिळते. ज्याचा कर्जाच्या EMI वर नक्कीच मोठा परिणाम होतो. साधारणपणे महिला सह-अर्जदारांसाठी वेगवेगळे गृहकर्ज व्याजदर देतात. हा दर इतर दरापेक्षा अंदाजे ०.०५ टक्के (५ बेसिस पॉइंट) कमी असतो. याचा लाभ घेण्यासाठी, स्त्री ही मालमत्तेची एकमेव किंवा संयुक्त मालक असणे गरजेचे असते.
7 लाखापर्यंत कर वाचवू शकता
संयुक्त गृहकर्जामध्येही प्राप्तिकर लाभ मिळतात. संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करून, दोन्ही कर्जदार वेगवेगळे आयकर लाभ घेऊ शकतात. परंतु हा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा अर्जदार दोघेही मालमत्तेचे मालक असतील. तुमच्या पत्नीसोबत संयुक्त गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला दुप्पट कर लाभ मिळेल. मूळ रकमेवर, तुम्ही दोघेही 80C अंतर्गत प्रत्येकी 1.5 लाख रुपये म्हणजेच एकूण 3 लाख रुपयांचा दावा करू शकता. त्याच वेळी, दोघेही कलम 24 अंतर्गत व्याजावर 2 लाख रुपयांचा कर लाभ घेऊ शकतात. अशा प्रकारे पाहिल्यास, तुम्हाला एकूण 7 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळू शकतो. तथापि, ते तुमच्या गृहकर्जाच्या रकमेवर देखील अवलंबून असेल.
कर्ज सहज उपलब्ध होते
बऱ्याच वेळा लोकांना खराब क्रेडिट स्कोअर, कमी उत्पन्न आणि/किंवा इतर प्रकारचे कर्ज ते उत्पन्नाचे प्रमाण यामुळे कर्ज घेण्यास अडचणी येतात. अशा वेळी संयुक्त गृहकर्ज उपयुक्त ठरु शकते. अर्जदार म्हणून तुमच्यासोबत आणखी एका व्यक्तीला जोडून कर्ज घेण्याची पात्रता वाढते. संयुक्त कर्जामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तीची पैसे भरण्याची क्षमता चांगली असेल तर कर्ज सहज उपलब्ध होते. हा नियम कोणत्याही प्रकारच्या संयुक्त कर्जाला लागू होतो, मग ते संयुक्त गृहकर्ज महिला अर्जदाराने घेतलेले असो किंवा पुरुष अर्जदाराने घेतलेले असो.
कर्ज रकमेची मर्यादा वाढते
एकाच कर्ज अर्जदाराला त्याच्या उत्पन्नानुसार कर्ज दिले जाते. पण संयुक्त कर्जामध्ये दोघांचे एकूण उत्पन्न गृहीत धरले जाते. अशा परिस्थितीत कर्जाच्या रकमेची मर्यादा वाढते. परंतु हे लक्षात ठेवा की तुमचे आणि तुमच्या सह-अर्जदाराचे कर्ज ते उत्पन्नाचे प्रमाण 50 ते 60 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
